पाली : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सुधागड तालुक्यालादेखील जोरदार बसला असून सर्वच गावांत छोटे-मोठे नुकसान झाले आहे. यात महावितरणचेदेखील मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्याप वीज नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व सरपंचांची बैठक घेऊन ग्रामस्थ आणि तरुणांचे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले होते. ग्रामस्थांनी या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरणच्या कामास हातभार लावला आहे. हे काम जोरदार सुरू असून कामाला गती आली आहे.सुधागड तालुक्यात सर्वच ठिकाणी वादळाचा फटका बसला असून सर्वात जास्त हानी ही महावितरणची झाली आहे. अजून कित्येक गावांत वीज चालू झालेली नाही, यासाठी तालुक्यातील यंत्रणेने कंबर कसली असून लवकरात लवकर वीज गावात पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून तहसीलदार रायन्नावर, महावितरणचे जतीन पाटील यांनी संयुक्तपणे तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक बोलावून तालुक्यातील महावितरणची परिस्थिती समोर ठेवली. आमचे लोक तसेच आपल्या गावातील काही तरुण मुले यांच्या सहभागातून आपण पडलेले पोल खांब तसेच वायर खेचण्याचे काम जर केले तर येत्या काही दिवसांत आपण संपूर्ण तालुक्यात लवकरात लवरकर वीज पोहोचवू शकू अन्यथा पूर्ण महिना गेला तरी वीज येण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नाडसूर, नागशेत, गोमाशी, मढाळी, वाघोशी वाफेघर, विडसई, भेरव कुंभारशेत, कुंभारघर यासारख्या अनेक गावांत लोकसहभागातून महावितरणचे काम सुरू झाले आहे.निसर्ग चक्रीवादळात पंचनाम्याचे काम संपण्याच्या मार्गावर आहे; परंतु त्यातूनही कोणत्याही नागरिकाचे अथवा घटकाचे पंचनाम्याचे काम झाले नसेल तर त्यांनी तत्काळ तलाठी, मंडळ अधिकारी अथवा ग्रामसेवक यांना संपर्क साधावा, त्यांचे पंचनामे त्वरित करण्यात येतील.- दिलीप रायन्नावर, तहसीलदारवादळ झाल्यानंतर आमच्या गावचे १३ हायटेन्शनचे पोल पडल्यामुळे आमचे गाव गेले आठ दिवस अंधारात आहे. आमच्या गावकीने ठरवल्यानुसार प्रत्येक घरटी एक माणूस कामावर येऊन आमचे लोक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत. त्यामुळे आमच्या गावात उद्या वीज नक्की येईल.- राजेश बेलोसे, वाफेघर ग्रामस्थ
सुधागडमध्ये लोकसहभागातून महावितरणचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:25 PM