उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:33 PM2019-05-02T23:33:51+5:302019-05-02T23:34:06+5:30
अशुद्ध पाणीपुरवठा : १८ गावांतील ग्रामस्थांनी उपसला गाळ
अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढण्यात येईल. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये काही दोष असल्यास ते दूर करण्यात येतील. नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांना गाळातीलच पाणी प्यावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सरकारसह प्रशासन काही उपाययोजना करत नसल्याने अलिबाग तालुक्यातील उमटे धरण परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांनी श्रमदान करून धरणातील गाळ काढला. धरणाचे पात्र प्रचंड मोठे असल्याने सर्वच गाळ काढणे शक्य नसल्याने ग्रामस्थांच्या या कृतीचा सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा हीच अपेक्षा ग्रामस्थांची आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उमटे धरण परिसरातील १८ गावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत धरणाची पाणीसाठवण क्षमता आणि जलस्रोत वाढविण्याकरिता गाळउपसा श्रमदान मोहीम राबविली. सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जाऊन धरणक्षेत्राचा विकास करण्यात यावा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. धरणाची साठवण क्षमता मोठी असली तरी सध्या धरण चारही बाजूंनी गाळाने भरलेले आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, धरणाची डागडुजी तत्काळ करावी यासाठी असंख्य तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
रामराज परिसरात या धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषेदला हस्तांतरित झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे ३० दशलक्ष घनफूट कमी झाली आहे, असे ग्रामस्थ अॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १५ मे नंतर गाळ काढण्यात येणार असल्याने तोपर्यंत गाळातील पाणी नागिरकांनी प्यावे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
कोट्यवधीचा निधी खर्चून बांधण्यात आलेले धरण ज्या क्षमतेने पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त ठरणे गरजेचे आहे त्याप्रमाणे ते उपयुक्त ठरत नाही. उमटे धरणातून साधारणत: दीड लाख लोकांची तहान भागविण्याची क्षमता आहे. आजघडीला धरणालाच कोरड आणि भेगा पडल्याचे दिसून येते. धरणात गुरांचे शेण मलमूत्र, मानवी विष्टा दिसून येते. त्याचप्रमाणे शेवाळ, केरकचराही मोठ्या प्रमाणावर असल्याने सभोवतालच्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, दूषित पाण्यामुळे विविध आजार, रोगराई पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाने उमटे धरणातील गाळ लवकरात लवकर न उपसल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माझेरी आगरी समाज उपाध्यक्ष रामचंद्र गुंड यांनी दिला आहे.
उमटे धरण मोठे आहे. त्याची साठवण क्षमता आणि पात्रही विस्तृत आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुुरू करण्यात आलेली आहे. धरणातील गाळ १५ मेनंतर काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलशुद्धीकरण यंत्राच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही, याची शहानिशा केली जाईल. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा