पोलादपूर : कशेडी घाटात चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यातही वेगाने सुरू आहे. या कामामुळे चोळई गाव हद्दीत एका अवघड वळणावर रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीसह मोठी वाहने घसरून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कशेडी घाटात महामार्गावर रस्त्याच्या कामाला वेग आला असून डोंगराची दगड, माती भरण्यासाठी जेसीबी व डम्पर वारंवार रस्त्यावर येत असल्याने डम्परच्या चाकाच्या मातीने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहे. रस्त्याच्या या स्थितीबाबत प्रवासी व चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे दिवस असल्याने व घाटात वेडीवाकडी वळणे असल्याने अशी चिखलाची स्थिती रस्त्यावर असेल तर हे अपघाताला निमंत्रण असल्याचे बोलले जात असून यावर उपाययोजनेची मागणी होत आहे.
गेल्या काही महिन्यात या घाटात अनेक छोटे- मोठे अपघात घडले आहेत. यात जास्त वाहने घसरून पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधित खात्याकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळीही कशेडी पोलीस प्रशासनाने दाखल घेत काही तासात दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरू केली अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, याकडे संबंधित अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.