जयंत धुळप / अलिबाग
महाडमधील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पा.म.थरवळ कन्या विद्यालयामध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी मुक्ता राहूल वारंगे यां विद्यार्थिनीला राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक म्हणुन नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञनिक स्पर्धेत कुमारी मुक्ताने यश मिळविले. त्याचप्रमाणे येथील परांजपे विद्या मंदिरातील अमेय शिवाजी यादव इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाला देखील बाल वैज्ञानिक म्हणून सन्मानित करण्यात आले. वरील दोन्ही विद्यार्थ्यांचे महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन तर्फे सन १९८१ पासून डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा चार टप्प्यामध्ये घेण्यात येते. पहिला टप्पा लेखी परिक्षेचा असून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रात्यक्षिक सादरीकरण असते. तिसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत घेण्यात आल्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये प्रकल्प तयार करुन त्याचे सादरीकरण करणे हे महत्त्वाचे असते. अतिशय कठीण तसेच बुध्दीची चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थाची बाल वैज्ञानिक म्हणून निवड केली जाते. या परिक्षेला या वर्षी संपुर्ण राज्यातून सुमारे ६० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. साठ हजार विद्यार्थ्यांपैकी ५१० विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली. या मध्ये महाडमधील कुमारी मुक्ता राहूल वारंगे आणि अमेय शिवाजी यादव यांचा समावेश असून या दोघांना सन्मानित करण्याात आले. महाडसारख्या ग्रामीण भागांमध्ये अपुरी सुविधा असताना राज्यस्तरीय स्पर्धे नेत्रदिपक यश मिळविलेल्या मुक्ता आणि अजय यांचे महाड आणि पोलादपुर तालुक्यांतून सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिलीप पार्टे, शाळेच्या सभापती सौ. सपना बुटाला यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद यांनी देखील विद्यार्थ्याचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. महाड येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलाला मुक्ता आणि अजय यांनी मिळविलेल्या यशाचा सार्थ अभिमान असल्याचे मुख्याध्यापक वळवी यांनी सांगितले आहे.