पालीतील शेतकऱ्याने फुलवली बहुपीक शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:17 AM2021-01-31T00:17:55+5:302021-01-31T00:18:23+5:30
Farmer News : कोरोनामुळे मंडप डेकोरेशनचा धंदा ठप्प झाला, मग आता करायचे काय या चिंतेत असलेले पालीतील दीपक शिंदे यांनी आपल्या शेतात बहुपीक पद्धतीचा वापर केला.
- विनोद भोईर
पाली : कोरोनामुळे मंडप डेकोरेशनचा धंदा ठप्प झाला, मग आता करायचे काय या चिंतेत असलेले पालीतील दीपक शिंदे यांनी आपल्या शेतात बहुपीक पद्धतीचा वापर केला.
दीपक शिंदे यांची अंबा नदीकिनारी मोरटाक्याजवळ साडेतीन एकर शेती आहे. दरवर्षी दिवाळीनंतर भात कापणी झाल्यावर शेतात वाल व इतर कडधान्य ते घेत असत. मात्र, यंदा बहुपीक लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी तब्बल २५ फुल-भाजीपाल्याची व कडधान्याची पिके लावली. वांगी, मिरची, टोमॅटो, घेवडा, पालक, माठ, वाल, मटकी, झेंडू, नवलकोल, गवार, मुळा, मेथी, कोथिंबीर, शिराळी, दुधी, कारली, घोसाळी, काकडी, चवळी व मका, मटकी, मूग, हे सर्वच शेतात आहे. उन्हाळी भात शेतीही केली आहे. पत्नी दीपिकासह शेतात राबतात, जोडीला एक जोडपे कामाला आहे. कष्टाच्या जोरावर चांगले उत्पन्न सुरू झाले आहे. शिंदे यांनी मटकी अर्धा एकरात, चवळी अर्धा एकर, हरभरा अर्धा एकरात, भात अर्धा एकरात, तसेच वाल, पावटा व घेवडा अर्धा एकरात आणि एक एकरात भाजीपाला लावला आहेे.
९ लाखांचे लक्ष
रोजचा तयार भाजीपाला काढून स्वतःच किंवा पत्नी भाजी विकण्यास पाली बाजारपेठेत बसतात. लोकांनाही स्वस्त व ताजी भाजी मिळते. रोज भाजीपाला तयार होतच आहे. काही दिवसांत भाज्यांची आवक कमी होईल, कडधान्याची मागणी वाढेल आणि दिवसाला ३ ते ४ हजार रुपये मिळतील. त्यामुळे मे पर्यंत ९ लाखावर हे उत्पन्न जाणार आहे.
डेकोरेशनचा धंदा कोरोनामुळे ठप्प झाला होता. मग बहुपीक शेती करण्याचा विचार केला. मुबलक पाणी, चांगली मशागत यामुळे चांगले उत्पन्न मिळू लागले.. आता ठरविले आहे की, शेतीच करावी. मंडपाचा धंदा बंद करावा. इतरही शेतकऱ्यांनी आपली शेती न विकता शेती करून भरघोस फायदा कमवावा. - दीपक शिंदे, शेतकरी