लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने मार्गिका सोडून पुणे बाजूकडील मार्गिकेवर तो उलटला. या दुर्घटनेत पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. एका कारमधील मुंबईचे पती-पत्नी जागीच ठार झाले व पाच जण जखमी झाले. हा अपघात फुडमॉलजवळ सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला.
कंटेनर कारवर उलटल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील बकूळ मनोहर राऊत (४६) व तेजस्विनी बकूळ राऊत (४५, दाेघेही रा. विलेपार्ले, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजना लोकरे (७३, धाराशिव), आशिष लोकरे (४५, धाराशिव, सध्या रा. हडपसर, पुणे), योगेश जाधव (३०, रा. माढा, सोलापूर), आरती गडदे (६५), अस्मिता खटावकर (४०, दोघीही रा. विलेपार्ले (पूर्व), मुंबई) हे प्रवासी जखमी झाले. यातील तिघांवर खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले.
- अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर चालक नाथम द्विवेदी (रा. जैतपूर, उत्तर प्रदेश) यास खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, आय.आर.बी. पेट्रोलिंग, वाहतूक पोलिस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेतली.