मुंबई-गोवा महामार्गाला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:28 AM2018-06-24T01:28:45+5:302018-06-24T01:28:49+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे कर्नाळा अभयारण्यात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पूल बांधण्याकरिता खोदकाम करण्यात आले आहे
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : मुंबई-गोवा महामार्गाचे कर्नाळा अभयारण्यात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पूल बांधण्याकरिता खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात महामार्ग कमकुवत झाला आहे. जास्त पाऊस झाल्यास रस्ता खचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा फटका महामार्गावरील वाहतुकीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांत झालेले नाही. पळस्पे ते इंदापूर हा ८४ कि.मी. लांबीचा पहिला टप्पा अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षभरापासून कामाला गती मिळाली आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यास सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे येथील वन्यप्राणी आणि पक्ष्यांना त्रास होण्याची शक्यता गृहीत धरून वनपरिक्षेत्र विभागाकडून या मार्गाच्या रुंदीकरणाला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु अलीकडेच या कामाला संबंधित विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात ११ मीटर रुंदीचा रस्ता होता. आता त्याची रुंदी वाढविली जाणार आहे. नवीन शिफारसीनुसार हा रस्ता १६00 मीटर लांब आणि तीस मीटर रुंद करण्यात येणार आहे. कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशव्दाराजवळ आणि तेथून काही मीटर अंतरावर असे दोन उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. त्याकरिता महामार्गाची एक बाजू खोदण्यात आली आहे. त्यामध्ये स्टील टाकून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूचा रस्ता काही प्रमाणात खचला आहे. त्यावर अवजड वाहनांची वर्दळ आणि पावसाचे पाणी यामुळे या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. जास्त पाऊस झाल्यास हा रस्ता कर्नाळा खिंडीत खचण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास दोनही बाजूकडील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. पुलाचे काम सुरू असलेला भाग आणि महामार्गाच्या मध्ये एक दरी पडली आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालक बुचकळ्यात पडतात. हे एक प्रकारे अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने वाहनधारकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाळा खिंडीत वाहतूक मंदावली
पुलाचे व रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या बाजूच्या मार्गिका पावसाचे पाणी आणि अवजड वाहतुकीमुळे उखडला आहे. परिणामी खिंडीत वाहतूककोंडी होवू लागली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अडकून पडावे लागत आहे.
दरड कोसळण्याची शक्यता
कर्नाळा अभयारण्य परिसरात रुंदीकरणाकरिता झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच डोंगर पोखरण्यात आला आहे. डोंगरांचे कडे ठिसूळ झाले आहेत. येथे खडक नाही तर फक्त माती आहे. त्यामुळे जास्त पावसात दरड कोसळून महामार्ग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डोंगराला जाळी लावण्याची आवश्यकता असल्याचे मत वाहनधारकांकडून व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहेत तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रशांत फेगडे,
प्रकल्प व्यवस्थापक,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
कर्नाळा अभयारण्यात महामार्गाचे काम सुरू आहे. तिथे अपघात किंवा वाहतूककोंडी होवू नये यासाठी आमचे कर्मचारी तैनात करण्यात येतात. तसेच खड्डे इतर कारणाकरिता संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अशोक नाईक,
प्रभारी अधिकारी,
नवीन पनवेल वाहतूक शाखा