मुंबई-गोवा : २ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; १४ वर्षांनंतर प्रथमच कारवाई, एका अधिकाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 05:23 AM2024-08-30T05:23:19+5:302024-08-30T05:25:05+5:30
१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या २६.७ किमी अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
माणगाव पोलिसांत गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कावळे यांना अटकही करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी महामार्गावरील अपघातांस जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
चार वर्षांत १७० अपघात आणि ९७ बळी
महामार्गाच्या कामातील हलगर्जीमुळे २०२० पासून आतार्यंत १७० मोटार अपघातांत ९७ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
२०१७ पासून काम सुरूच...
- रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि. मी. अंतरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदांद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून काम सुरू केले.
- या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढून दिली होती. अजूनही हे काम अपूर्णावस्थेतच आहे.