पाली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे कोकणवासीय, चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच होत आहे. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महामार्गावर खड्डे काही प्रमाणात भरण्याचे काम झाले होते. बहुतांश ठिकाणी खड्डे भरण्यासाठी खडी व डांबराचे पॅच मारले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हे पॅचवर्क उघडे पडले आहेत. या ठिकाणी आता पहिल्यापेक्षा अधिक खड्डे पडले आहेत. त्यामुळे भाविकांचा कोकणाकडून परतीचा प्रवास अवघड होणार आहे.
महामार्गावर खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ता दुरुस्त करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी खडी व डांबराचा थर टाकण्यात आला होता, तेथे आता पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये माती व चिखल झाला असून दुचाकीस्वारांची चांगलीच कसरत होत आहे, तर काही ठिकाणी खडी मार्गावर पसरली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे रस्ते वर-खाली झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रामवाडी ते इंदापूर आणि त्याही पुढे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
पनवेल ते पेणपर्यंत ठिकठिकाणी खड्डे आहेत. चिकणी, सुकेळी, वडखळ, रातवड आदी ठिकाणी तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाकण, नागोठणे, कोलाड, सुकेळी, पेण, वडखळ आदी गावांजवळ रस्त्यावर टाकण्यात आलेला खडी व डांबर मिश्रणाचा कोट पुन्हा निघाला आहे. पनवेलपासून पुढे इंदापूरपर्यंतच्या मार्गावरील खडी व डांबराच्या मिश्रणाने बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दुभाजकाजवळ ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खडतर मार्गावरून कोकणातून परतणाºया भक्तांची पुरती त्रेधातिरपीट उडणार आहे. तसेच अपघातांचा धोकादेखील वाढण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात मार्गावरील खड्डे बुजविल्यावर आता तरी हा मार्ग चांगला होईल, अशी आशा होती. मात्र, रस्त्याची पुन्हा झालेली चाळण पाहता खड्ड्यांचे विघ्न काही संपताना दिसत नाही.- राकेश कामथे, प्रवासी, नागोठण