धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:21 AM2019-08-21T06:21:11+5:302019-08-21T06:21:15+5:30
पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे.
पेण : येथील खारपाडा-जिते गावापासून ते थेट वडखळ-डोलवी गावापर्यंत १९ किमी अंतरावरील टप्प्यात कडक पडत असलेल्या उन्हात महामार्गावर धुळीचे लोट वाहने चालवताना उडत आहेत. या धुळीचा वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित आजारात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धूळमिश्रित वातावरण गेले पाच, सहा दिवस सुरू आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला याचे सोयरसुतक नाही. यामुळे प्रवासी, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आरोग्याला बाधा आणणारे वातावरण महत्त्वाच्या अशा या मुंबई-गोवा महामार्गावर आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला याबाबत नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे. वीकेंडला होणारी वाहतूककोंडी असो, अपघात असो वा ऐन पावसाळ्यात सुरू केलेला पेण शहराच्या समोरील मातीचा भराव. रेल्वे स्थानकासमोरचा पूल, रामवाडी पूल या कामामुळे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने जनतेला वेठीस धरले होते. या त्रासात या धुळीने भर घातल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावरील धुळीच्या उडणाºया लोटामुळे वाहतूक ही मंद गतीने सुरू आहे. समोरचे वाहन धुळीच्या लोटांमुळे नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीत वाहतूक पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. धुळीच्या त्रासामुळे होणारे आजार व आर्थिक भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी आता जनतेलाच पुढे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागणार आहे.
वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
कार्लेखिंड : मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. प्रवाशांबरोबरच आजूबाजूची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग असो किंवा राज्यमार्ग असो सर्व रस्त्यावरील अवस्था सध्या स्थितीला हीच आहे. चालू पावसाळ्यात मुंबई - गोवा महामार्गावर तरणखोप ते वडखोप खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्याचबरोबर अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून खड्डे भरण्याचे काम सतत चालू आहे. चालू पावसात खड्ड्यात मातीमिश्रित खडी टाकली जाते आणि खड्डे भरले जातात, परंतु तेच खड्डे पुन्हा पुन्हा तयार होत आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. अवजड वाहने सतत वेगाने चालू असल्याने रस्त्यावरील धुळीचा डोंब अगदी धुक्यासारखा होत आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन सुद्धा दिसत नाही. परंतु या धुळीचा त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्ग किंवा रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा या धुळीला सामोरे जावे लागत आहे. या धुळीमुळे सर्वांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.