मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, चौपदरीकरणाचे काम थांबल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:15 AM2020-07-08T00:15:10+5:302020-07-08T00:15:37+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले.
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव ते महाड या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, दहा किलोमीटरचा प्रवास जीवघेणा झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरण सुरू असून, गेले तीन महिने महामार्गाचे चौपदरीकरण लॉकडाऊनमुळे थांबले होते. यामुळे पावसाळ्यात जुन्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. दासगाव आणि महाडदरम्यान नवीन रस्त्याला जोडणाºया जुन्या रस्त्यावर दासगाव, वहूर, केंबुर्ली या गावांच्या हद्दीत खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीकडून बुजविण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांच्या सततच्या पावसामुळे पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.
आजच्या परिस्थितीत दासगाव ते महाड १० किलोमीटरचा प्रवास या महामार्गावरून धोक्याचा झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये या खड्ड्यांच्या ठिकाणी पंधरा मोटारसायकलस्वारांना अपघात झाला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे हे काम सुरू असलेल्या ठेकेदार कंपनीने भरायचे आहेत. हे खड्डे वेळीच भरणे अपेक्षित होते; परंतु ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती महामार्गावर निर्माण झाली आहे. तरी ठेकेदार कंपनीने गांभीर्य लक्षात घेत, खड्डे ताबडतोब भरावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. पडलेल्या खड्ड्यांबाबत ठेकेदार कंपनीकडे संपर्क साधला असता, प्रोजेक्ट अधिकारी जे.एम. नायडू यांनी खड्डे लवकरच व्यवस्थित बुजविले जातील, असे सांगितले.