मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:31 PM2019-10-30T22:31:56+5:302019-10-30T22:32:20+5:30

प्रवासी वाहनचालक त्रस्त : पर्यटन, दळणवळणावर परिणाम

Mumbai-Goa highway goes into a pit; An invitation to an accident due to a bad road | मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण

मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण

googlenewsNext

संतोष सापते 

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असलेला मुंबई-गोवा खड्ड्यात गेला आहे. येथे रस्त्याची सर्वत्र चाळण झाली असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही, अशी येथील स्थिती आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूककोंडी व अपघातास चालना मिळत आहे. परिणामी, प्रवाशांचे, तसेच स्थानिकांचे हाल होत आहेत.
मुंबई- गोवा महामार्गाचे काम चालू आहे मात्र माणगाव ते पेण रस्ता आजमितीस वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने त्याचा परिणाम पर्यटन, दळणवळण व सण उत्सव या सर्व बाबींवर होत आहे.

कोकणाला मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, आज या महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पोलादपूर, महाड, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, वडखळ, पेण ते पनवेल सर्व रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही. माणगाव ते वडखळ मार्गावर रस्त्याची अवस्था बिकट झाली असून हा महामार्ग आहे का? या विषयी जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. माणगाव सोडल्यानंतर पुढे प्रवास करताना वाहनचालकांना वाहने चालविणे मुश्कील नव्हे, तर अशक्य झाले आहे. कोलाड पुलाची अवस्था गंभीर झाली असून, त्या वरून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. नागोठणे ते वडखळ अवजड वाहतूक नियमित निदर्शनास येते; त्यामुळे वाहतूककोंडी ही सदैव जनतेच्या वाट्याला येत आहे. नागोठणे व वडखळच्या हद्दीत विविध कंपन्या आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या जास्त दिसून येते. वडखळ ते पेण प्रवास हे दिव्य मानले जाते. पेण ते वडखळ अवघे सहा किलो मीटरचे अंतर नसताना एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माणगाव ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संबंधित अभियंता पी. डी. फेगाडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तर माणगाव ते पनवेल हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे आपण संबधित खात्याशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य महामार्ग अभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले.


पर्यटकांची संख्या होतेय कमी
१) कोकणातील श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, महाड ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गावे आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे. कारण मुंबई ते माणगाव १५० किमीचे अंतर आहे, परंतु त्यासाठी वेळ प्रसंगी चार ते पाच तासांचा कालावधी लागत आहे.
२) परिणामी, पर्यटक कोकणच्या ऐवजी प्रवास सुखकारक ठरेल अशा ठिकाणाला प्राधान्य देत आहेत. या दिवाळी सणाला कोकणात घरी आलेल्या सर्व चाकरमान्यांना रस्त्याच्या दुर्दशेचा त्रास सहन करावा लागला आहे. भाऊबीजेच्या दिवशी कोलाड ते वडखळ रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र लांबच लांब वाहनांच्या रांगा दिसून आल्या.
३)महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, तंव्हा जाईल, परंतु आजमितीस कमीतकमी रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती तरी डागडुजी करावी व सामान्य व्यक्तीस प्रवास करता येईल, असा रस्ता तयार करावा अशी मागणी प्रवासी, स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

नागठणे ते वडखळ प्रवास नकोसा वाटत आहे. रस्त्याची परिस्थिती अतिशय भयंकर झाली आहे. कॉलेज जातांना दररोज जास्त वेळ जातो. जनतेच्या प्रतिनिधींनी एकदा तरी सार्वजनिक वाहनातून पेण, वडखळ ते नागोठणे प्रवास केल्यास त्यांना रस्त्यांची दुर्दशा समजेल. - पायल नाईक, विद्यार्थिनी, विधि विद्यालय, अलिबाग.

अलिबागला जाताना माणगाव ते वडखळ रस्त्यावर वाहन चालविणे अतिशय कठीण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविताना कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न पडतो. कोणत्याही खड्ड्यात गाडी गेली, तरी त्रास हा होतोच. परिणामी, वाहनांचे नुकसान होत असून देखभालीवर खर्च होत आहे. - हेमंत चांदेकर, व्यावसायिक, महाड.

Web Title: Mumbai-Goa highway goes into a pit; An invitation to an accident due to a bad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.