लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवा महामार्ग गणेश चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. या महामार्गावरील खड्डे चार प्रकारच्या तंत्रज्ञानांनी भरले जातील, असे त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली.
पळस्पे येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिला थांबा गडब येथे घेतला. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच या नव्या पद्धतीने खड्डे भरले जात असल्याचे सांगून नाशिक महामार्गासाठी वापरलेले तंत्र मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यासाठी वापरत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. हा पॅच तासाभरात सुकत असून, त्यावरून वाहने धावू शकतात, असे ते म्हणाले. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच हे एम ६०, आरएमसी आणि जिओ पॉलिमर याचे मिश्रण आहे. त्यामुळे पडलेला खड्डा या मिश्रणाने त्वरित भरला जात आहे. रॅपिड क्विक हार्डनर एम ६० याद्वारे ही खड्डे भरले जात आहेत. ज्या ठिकाणी रस्ता अधिक खराब आहे, तिथे डीएलसी पद्धतीने काम केले जाणार आहे, तर ज्या ठिकाणी खड्डेमय रस्ता असून, अधिक वाहतूक आहे त्याठिकाणी प्रिकोस्ट पॅनल जोडून रस्ता तयार केला जाणार आहे. अशा चार पद्धतीने महामार्गाचे काम शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने केले जात आहे. त्यामुळे गणपतीपूर्वी चाकरमान्यांना खड्डेमुक्त रस्त्याने प्रवास करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, महामार्ग अधिकारी उपस्थित होते.
उद्धवसेनेची निदर्शने
कोकणवासीयांना व चाकरमान्यांना मुंबई- गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पेण तालुक्यातील वाशी नाका येथे मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
कशेडी घाटातील दुसरी मार्गिकाही होणार खुली
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत कशेडी घाट हा चाकरमान्यांसाठी दरवर्षी मोठा अडथळा ठरत असतो. या घाटात नवीन बोगदा बांधण्यात आला असून गेल्यावर्षी एक मार्गिका सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मार्गिकेची पाहणी करीत ३ सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करीत ती गणेशभक्तांसाठी खुली करण्यात येईल असे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दिवसरात्र काम करा, अशा सूचना त्यांनी ठेकेदाराला यावेळी दिल्या. यामुळे या घाटातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याचे प्रवासातील विघ्न दूर होणार आहे.