मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:25 AM2020-01-24T01:25:59+5:302020-01-24T01:28:19+5:30

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Mumbai-Goa highway to speed up work | मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत

googlenewsNext

- राजेश भिसे
नागोठणे : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पनवेल ते सुकेळी हा मार्ग मे महिन्यापर्यंत चालू होण्याचे संकेत असून मे महिना लक्ष्य असल्याचे अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
साधारणत: १० ते १२ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. सन २०१४ पर्यंत पूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे शासनाकडून त्या वेळी सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात, जागा संपादित करणे, कर्नाळा खिंडीतील वृक्षराजी तसेच इतर कामांसाठी अडथळे येत होते व त्यामुळे प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने संबंधित ठेकेदारांना २०२० साल उजडूनही रस्ता पूर्णत्वास नेण्यात अपयश येत होते. त्या वेळी पनवेल- पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे कामाचे दोन टप्पे तयार करून ते दोन ठेकेदारांना देण्यात आले होते. मात्र, कामात दिरंगाई होत असल्याने कासू ते इंदापूर या मार्गातील खारढोंबी ते सुकेळी खिंडीच्या अलीकडच्या भागापर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी पनवेलच्या जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आले. या मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू असल्याने पनवेल ते सुकेळी हा नवीन महामार्ग मे महिन्यापर्यंत वाहतुकीस खुला होईल, असे सूत्रांनी सांगितले.

पनवेल ते सुकेळी या मार्गात इतर लहान पुलांबरोबर खारपाडा, पेण, निडी, वाकण आदी ठिकाणी मोठे पूल आहेत. पेण आणि निडी येथील पुलांवरून सध्या वाहतूकसुद्धा चालू करण्यात आली असून, खारपाड्याचा पूलसुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. वाकणचा पूलसुद्धा दृष्टिक्षेपात आला असल्याने महिनाभरात तो पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले. पळस येथील माती भरावाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे व १५ फेब्रुवारीपासून हा नवीन रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल, असे सांगण्यात आले.



एसटी थांबण्यासाठी सर्व्हिस रोड उपलब्ध
नागोठणे शहरालगतच्या कामात गोविंदा हॉटेल ते रमाईनगर आणि नागोठणे रेल्वेफाटक ते आयटीआय या मार्गात भराव असल्याने गाड्यावरून मार्गक्रमण करणार आहेत. नागोठणे शहरातून महामार्गावर जाणाऱ्या पेण फाट्यापर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो.
या रस्त्यावर मातीचा भराव येत असल्याने शहरातून वडखळ, पेण बाजूकडे जाणाºया एसटी बसेस तसेच इतर वाहनांना हा मार्ग राहणार असून, शहरात येणाºया सर्व वाहनांना मीरानगर येथील पुलाखालून प्रवेश करावा लागणार असल्याचे समजते.
लोकल एसटी बसेसना प्रत्येक गावाच्या ठिकाणी थांबण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात जाणाºया-येणाºया विद्यार्थ्यांना सध्याचा महामार्ग ओलांडून जावे लागत असते. महामार्ग आणि विद्यासंकुल यांच्यामध्ये रेल्वेमार्ग आहे व येथून पलीकडे जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. प्रस्तावित महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर वाहने वेगात धावणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ते आणखी धोकादायक ठरणार आहेत. याबाबत विचारणा केली असता, महामार्गाच्या वरून रेल्वे उड्डाणपुलाला जोडणारा नवीन उड्डाणपूल बांधण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आमच्याकडे उपलब्ध झाला नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Mumbai-Goa highway to speed up work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.