लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ :माथेरान येथील पेब किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेली मुंबई अंधेरी येथील पर्यटक तरुणी दरीत पडून गंभीर जखमी झाली. तिच्या सहकाऱ्यांनी आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने तिला दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. रिया अजेश साबळे (वय १६) असे या तरुणीचे नाव आहे.
मुंबई डी. पी. कॉलनी- महाकाली रोड अंधेरी येथील वर्ग मित्र-मैत्रिणींचा दहा जणांचा एक चमू किल्ल्यावर फिरण्यासाठी प्रथमच आला होता. यात सात मुली, तीन मुले होती. माथेरान घाटरस्त्यातील कड्याच्या गणपतीमार्गे ते पेब किल्ल्यावर पोहोचले. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी परतण्यासाठी निघाले असता व्ही आकाराच्या अवघड वाटेवर सोसाट्याचा वारा आणि निसरड्या पायवाटेवरून जात असताना रिया दरीत पडली.
रियाच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याने ती मदतीची याचना करीत होती. ग्रुपमधील तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्याचवेळी चमूतील अक्षय फरडे या तरुणाने दरीत उतरून तिला वर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने माथेरान सह्यादी रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील ढोले, सुनील कोळी, महेश काळे, चेतन कळंबे दाखल झाले. रियाला दरीतून वर काढून रुग्णालयात दाखल केले.
सोसाट्याचा वारा आणि निसरडी वाट शाळकरी विद्यार्थ्यांचा हा चमू किल्ल्यावरून परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर व्ही आकाराच्या एका अवघड वाटेवर सोसाट्याच्या वाऱ्याने त्यांना गाठले. वेगवान वारा झेलत निसरड्या वाटेवरून हा चमू चालत असताना रियाचा तोल गेला आणि ती दरीत कोसळली.