मुंबई - गोवा महामार्गावरील टोळ पुलाची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:31 AM2018-02-20T01:31:56+5:302018-02-20T01:31:56+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरून रत्नागिरीला जवळच्या मार्गाने जोडणाºया टोळ पुलाची पार दुरवस्था झाली आहे. काळ नदीवरील या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे नादुरुस्त झाले
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावरून रत्नागिरीला जवळच्या मार्गाने जोडणाºया टोळ पुलाची पार दुरवस्था झाली आहे. काळ नदीवरील या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे नादुरुस्त झाले असून रस्ता देखील दुरवस्थेत आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती करताना टोळ पुलाचे संरक्षण कठडे तोडण्यास प्रारंभ केला खरा, मात्र हे काम गेली १० दिवसांपासून काम बंद असल्याने रेलिंग संरक्षण नसलेला पूल येणाºया-जाणाºया वाहन आणि पादचाºयांना धोकादायक ठरला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची सीमा महाड तालुक्यात एकमेकांना जोडलेली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरीला जोडण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग टोळ मार्ग आहे. येथून मुंबई-गोवा महामार्गी आंबेत मंडणगड सहदोपाली मार्ग कोकणाला जोडला जातो. या जोड रस्त्यावरील टोळ गाव हद्दीमध्ये येणारा काळ नदीमधील पूल महत्त्वाचा असला तरी गेली अनेक दिवसांपासून या पुलाची पार दुरवस्था झाली आहे.
पुलावरील संरक्षण कठडे सिमेंट काँक्रीटचे असून ते मोडकळीस आले होते. रस्त्यावर खड्डे आणि छोट्या- मोठ्या वाहनांच्या वजनाने हादरे बसणारा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड शाखेमार्फत यावर्षी हा पूल आणि आंबेतपर्यंत जाणारा १२ किमी रस्ता अशा कामाला सुमारे तीन कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीअंतर्गत पुलाच्या संरक्षण कठड्याच्या कामाला प्रारंभ झाला असून ठेकेदाराने संरक्षण कठडे तोडण्यास सुरुवात केली आहे. गेली आठ दहा दिवसांपासून पुलाच्या एका बाजूचा अर्ध्या अंतरावरील कठडा तोडून टाकला आहे. कठडा तोडत असताना पुलाच्या रस्त्यावर खडी देखील टाकण्यात आली आहे. टोळ, सापे आणि परिसरातील ग्रामस्थ या पुलाची रस्त्याचा वापर दिवस-रात्र करत असतात. पुलावरील छोट्या मोठ्या वाहनांची संख्या आणि पादचारी लक्षात घेता या पुलाचे काम लवकर करणे गरजेचे आहे. पुलाचा कठडा तोडल्याने आणि पुलावर खडी टाकल्याने ये-जा करणाºया वाहनांना तसेच ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
टोळ पुलाच्या संरक्षण कठड्याचे काम करत असताना संबंधित ठेकेदार आणि कामगारांनी संरक्षण कठड्याच्या टाकावू काँक्रीटचा माल इतरत्र हलविणे गरजेचे होते. तसे न करता सदरचा माल काळ नदीपात्रात टाकून देण्याचे काम करण्यात आले आहे. टोळ पुलाखालून आजही स्थानिक मच्छीमारांच्या छोट्या मोठ्या होड्या देखील या पुलाचा वापर करतात. अशा प्रकारे काँक्रीटचा टाकावू माल नदीपात्रात टाकल्याने पुलाखाली गाळ साचल्याचे प्रमाण वाढणार आहे. शासकीय कामातच नद्यांमध्ये गाळ टाकल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते.