मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता
By वैभव गायकर | Published: August 16, 2024 06:39 AM2024-08-16T06:39:13+5:302024-08-16T06:39:53+5:30
उद्यापासून २,००० मेगावॅट अतिरिक्त वीज
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पातून विजेचा अखंडित वीजप्रवाह सुरू होणार असल्यामुळे मुंबई प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांची वारंवार खंडित होणारी वीज, लोडशेडिंग आणि ग्रीड फेल होण्याच्या धोक्यातून आता मुक्तता होणार आहे. पनवेलमध्ये या प्रकल्पाचे २३ किमी मार्गातून ५० पेक्षा अधिक टॉवर जात आहेत.
या प्रकल्पामुळे २००० मेगावॅट अतिरिक्त वीज निर्माण होणार असल्यामुळे मुंबई उपनगर, नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. १७ ऑगस्टपासून या प्रकल्पातून ही वीज प्रवाहित होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढतच आहे.
४०० टाॅवरची उभारणी
पडघे ते पनवेलदरम्यान ४०० पेक्षा अधिक टॉवर यासाठी उभारले आहेत. थेट गुजरातमधून महाराष्ट्राला जोडणारा हा ऊर्जा प्रकल्प आहे. २०२२ साली लोकाभिमुख प्रकल्पातील भूसंपादनासाठी धोरण निश्चिती करून भूधारकांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येत आहे.
१०,७२८ भूधारकांना कायमस्वरूपी मोबदला
या प्रकल्पामध्ये जवळपास १०,७२८ भूधारकांना कायमस्वरूपी मोबदला मिळणार आहे. मुंबई प्राधिकरण क्षेत्रातील नागरिक, शेतकरी, भूधारक, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक या सगळ्यांनाच याचा लाभ होणार असल्यामुळे राज्याच्या इतिहासात हा प्रकल्प मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. मुंबई प्राधिकरण क्षेत्र ऊर्जा सक्षम झाल्याने लोडशेडिंग आणि वारंवार खंडित वीजपुरवठ्यापासून देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनापासून मुक्तता मिळणार असल्याचा दावा मुंबई ऊर्जा प्रकल्प प्राधिकरणाने केला आहे.
महत्वाकांक्षी प्रकल्प
झपाट्याने वाढणारे निवासी क्षेत्र, औद्योगिक वसाहती ते अगदी वाहन इंधन क्षेत्र या साऱ्याच ठिकाणी अतिरिक्त विजेची मागणी सातत्याने होत असते. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ही निकड तातडीने ओळखून देशभरातील विकसनशील राज्यांना ऊर्जा सक्षम बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याचाच भाग म्हणून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प राबविण्यात येत आहे. येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकासाच्या प्रकल्पांसाठी वीज हाच प्रमुख ऊर्जास्रोत असेल. त्यामुळे उद्योगांकरिता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये येणारी अतिरिक्त वीज ही फायदेशीर ठरणार आहे.