पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:16 AM2021-01-30T01:16:27+5:302021-01-30T01:17:12+5:30
आरोग्य विभाग झाला सज्ज, पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे
वैभव गायकर
पनवेल : ० ते ५ वयोगटातील चिमुकल्यांसाठी राबविली जाणारी पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. पनवेल पालिकेचा आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाला आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.
पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे. याकरिता ९० हजार पोलिओ डोस प्राप्त झालेले आहेत. कोविडमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे मुलांना या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. याकरिता कर्मचारी, पथक तसेच इतर सर्व तयारी पूर्ण झाल्याने ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. कोविड काळात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याकरिता घरोघरी, एसटी स्टॅण्ड, मुख्य चौक आदी ठिकाणी मोबाइल पथक हे डोस देणार आहेत.
आरोग्य केंद्रात होणार लसीकरणाची प्रक्रिया
लसीकरणासाठी पालकांनी रविवारी आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ वयोगटाखालील मुलांना लसीकरणासाठी घेऊन जाणे गरजेचे आहे. रविवारी एक दिवस ही प्रक्रिया चालेल.इतर दिवशी घरोघरी, चौकात, एसटी स्टॅण्ड आदी ठिकाणी मोबाइल पथकांच्या मार्फत हे लसीकरण केले जाणार आहे.
पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेतील कर्मचारी निश्चित झाले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोविड काळात सुरक्षित पोलिओ लसीकरणासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडेल.
- डॉ. रेहाना मुजावर, आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिका