महापालिका २९ गावांमध्ये राबविणार भुयारी गटार योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:45 AM2020-02-19T01:45:57+5:302020-02-19T01:46:01+5:30
महासभेची मंजुरी : १६७ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांमध्ये पनवेल महानगरपालिका १६७ कोटींची भुयारी योजना राबविणार आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या मार्फत हा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. मंगळवारी पार पडलेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.
या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेमणूक करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उघडी गटारे, नाले आदींचा अभाव आहे. अनेक गावांमध्ये गटाराचे पाणी उघडड्यावर वाहत असल्याने गावांमध्ये दुर्गंधी तसेच रोगराईचा फैलाव होण्याची भीती असते. शहरी व ग्रामीण भागात निर्माण झालेली तफावत दूर करण्यासाठी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात पुढाकार घेत भुयारी गटार योजना २९ गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महासभेत एकूण १७ विषय महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. आजची महासभा दुपारी २ च्या वेळेला आयोजित करण्यात आली असल्याने नेहमीपेक्षा महासभेच्या कामकाजाला उशीर होत असल्याने अनेक ठराव घाईघाईत मंजूर करण्यात आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी ठरावांच्या मंजुरीला आक्षेप घेत. पनवेल शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणे, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचे निवासस्थान बांधणे, पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदींसह एकूण
१६ विषयांना मंजुरी देण्यात आली.
महत्त्वाच्या विषयांना महासभेत मंजुरी देण्यात आली. यापैकी पालिकेत समाविष्ट २९ गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भुयारी गटार योजनेला महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या गावांमध्ये शंभर टक्के भुयारी गटारे होणार आहेत.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका