पालिकेच्या मुकादमांना गटारी भोवली
By admin | Published: August 18, 2015 11:31 PM2015-08-18T23:31:28+5:302015-08-18T23:31:28+5:30
पनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या
प्रशांत शेडगे,पनवेल
पनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या चांगलाच अंगलट आला आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी अचानक दिलेल्या भेटीत एकही कामगार न आढळल्याने त्यांनी मुकादमांना निलंबित केले. त्याचबरोबर एकूण तेवीस कामगारांवर एक दिवस विनावेतनाची कारवाई केली आहे.
पालिकेवर पनवेल शहर, तक्का, धाकटा आणि मोठा खांदा या परिसरांची साफसफाई व स्वच्छतेची जबाबदारी आहे. सफाई कामगारांनी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत काम करणे अपेक्षित आहे. मात्र कित्येकजण कामचुकारपणा करतात.
१४ आॅगस्टला अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी खांदा गावात अचानक भेट दिली. त्यावेळी सफाई कामगार, मुकादम व सहाय्यक मुकादमही बेपत्ता होते. पंडित यांनी त्वरित आरोग्य सभापती गणपत म्हात्रे यांना कळवले असता, मुकादमाने गटारीकरिता कामगारांना सोड़ून दिल्याचे कळाले. याप्रकरणी एकूण २३ कामगारांना त्या दिवशी विनावेतन करून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. तसेच मुकादम सूर्यभान भीमसेन काळे आणि सहाय्यक मुकदाम संतोष गायकवाड यांना निलंबित केले आहे.