नगरपरिषद कार्यालय कम्युनिटी सेंटरमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:43 AM2019-03-10T00:43:50+5:302019-03-10T00:44:41+5:30
माथेरानमधील नागरिकांना दिलासा; डागडुजी, साफसफाईची गरज
माथेरान : नगरपरिषद स्थापन झाल्यापासून हेरिटेज दर्जा प्राप्त असलेले नगरपरिषद कार्यालय अनेक वर्षांपासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत आहे. बाजारपेठेपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्यालयात नागरिकांना पायपीट करीत समस्या अथवा कामे घेऊन जावे लागते, त्यामुळे नागरिकांची दमछाक होते. त्यातच ज्येष्ठ नागरिकांना हा दूरवरचा पायी प्रवास जिकिरीचा आहे.
जुन्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना बसण्याची योग्य सोय नाही, सभापतींसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नाहीत, जागेची कमतरता तसेच कर्मचाऱ्यांवर अंकुश राहण्यासाठी आणि अन्य बाबींच्या अभावामुळे एकंदरच कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील काळात २००१ मध्ये प्रस्थापित असलेल्या सत्ताधारी गटाने हे हेरिटेज कार्यालय नव्याने उभारलेल्या शास्त्री हॉल (कम्युनिटी सेंटर) येथे हलविण्यात यावे, असे सुचविले होते. सध्या कार्यरत शिवसेनेच्या सत्ताधारी गटाने हा विषय तडीस नेण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून जुने कार्यालय कम्युनिटी सेंटर येथे हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्याबाबत कायदेशीर पूर्तता करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विचारात घेऊन २९ जानेवारी २०१८ मध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्या वेळेस विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कुठल्याही प्रकारची हरकत वा तक्र ार केली नाही. सद्यस्थितीत कम्युनिटी सेंटरमध्ये वर्षातून दोन ते चार कार्यक्र म आयोजित केले जातात.
कम्युनिटी सेंटरमध्ये नगरपरिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांनाही हे ठिकाण रेल्वे स्टेशन जवळ असल्याने सोयीस्कर ठरणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खर्चासाठी प्रशासकीय वित्तीय मंजुरी घेण्यात आली आहे. कम्युनिटी सेंटरमध्ये प्लायवूड पार्टिशन, फर्निचर, विद्युतीकरण, स्वच्छतागृह व अनुषांगिक कामे करणे आवश्यक आहे. हा निधी कामांअभावी माघारी जाणार असल्याने विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वरिष्ठांना निवेदन सादर करून बाळासाहेब ठाकरे सभागृह दुरुस्ती आणि कम्युनिटी सेंटर येथे नगरपरिषद कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी जवळपास दोन कोटींपेक्षाही अधिक निधी वापरात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.
विकासकामे पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारात घेऊन मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. जुन्या कार्यालयात आरोग्य विभाग तसेच नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांचे दालन तसेच ठेवणार असून, जुन्या इमारतीचे सुशोभीकरण करणार आहोत. मॉनेटरिंग कमिटीच्या परवानगीने आम्ही जुन्या कार्यालयाचे स्थलांतर करीत आहोत.
- प्रसाद सावंत, गटनेते,
बांधकाम सभापती, माथेरान