नांदगाव : मुरूड नगरपरिषदेची पोटनिवडणूक ४ आॅगस्टला होणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये ही निवडणूक होणार असून येथे या दोन्ही पक्षाची कसोटी लागणार आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली विरकूड यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक येथे लावण्यात आली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोणकोणते पक्ष या निवडणुकीत रस घेतात ही बाब स्पष्ट होणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित निवडणूक लढणार आहेत. या दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार तयार केले असून अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी हे अर्ज दाखल होणार आहेत. तर काँग्रेस आय पक्ष सुध्दा ही निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाने अद्याप पर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर या पोटनिवडणुकीत त्यांनी उमेदवार उभा न केल्यास त्यांचा पाठिंबा कोणाला असेल यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. या प्रभागात शेतकरी कामगार पक्षाची निर्णायक मते असून त्यांचे सहकार्य ज्या पक्षाला मिळेल त्याची वरचढ बाजू असणार आहे. काँग्रेस आय पक्षाचे युवा नेते अभिजीत सुभेदार म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून आरती गुरव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. थोडक्यात ही पोटनिवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट होत आहे. शिवसेनेकडून या पोटनिवडणुकीसाठी गिताली राकेश भगत यांना उमेदवारी दिली असल्याचे शहर प्रमुख प्रमोद भायदे यांनी सांगितले. येथून पुन्हा एकदा शिवसेनेच्याच उमेदवार विजयी होतील असा आत्मविश्वास भायदे यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी या पोटनिवडणुकीबद्दल सांगितले की, मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून आम्ही अवघ्या ५० मतांनी ही जागा गमावली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी पार्टी स्वबळावर लढणार असून मागील पराभवाची उणीव आम्ही भरून काढू. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक यांनी वेगळा गट केल्याने त्याचे पडसाद सुध्दा या पोटनिवडणुकीत दिसणार आहेत. थोडक्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात मुख्य लढत होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तेव्हा मुरूड नगरपरिषदेची ही पोटनिवडणूक रंगणार असून, यासाठी विविध पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. (वार्ताहर)
नगरपरिषद पोटनिवडणूक रंगणार
By admin | Published: July 13, 2015 3:02 AM