नियमबाह्य इमारतीला नगरपालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:35 AM2019-08-01T01:35:18+5:302019-08-01T01:35:29+5:30
रोह्यात खळबळ : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशीचे आदेश; इमारतीचे बांंधकाम पूररेषेत
मिलिंद अष्टिवकर
रोहा : शहरातील पर्ल पार्क इमारतीच्या नियमबाह्य बांधकामाविरोधात आलेल्या अनेक तक्रारी आणि उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारतीच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत रोहा नगरपालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने रोहा शहरात खळबळ माजली आहे. याबाबत नगरसेविका समीक्षा बामणे आणि सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी मुख्याधिकाºयांना पत्र लिहून जाब विचारला आहे.
रोहा शहरातील अष्टमी रोडवरील गेले तीन वर्षे सुरू असलेल्या हाफिज बिल्डर यांच्या पर्ल पार्क इमारतीचे बांधकाम पूररेषेत आहे. पालिकेने मागणी करूनही बिल्डरने पाटबंधारे विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द केलेले नाही. त्याचबरोबर नगरपालिकेकडून जोता तपासणी करून, प्रमाणपत्र घेऊन जोत्यावरील बांधकाम करणे नियमाधीन असतानाही बिल्डरने जोता तपासणी प्रमाणपत्र न घेताच बांधकाम सुरू ठेवले होते, या सर्व प्रकारामुळे नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी या बिल्डरला बांधकाम थांबविण्यासंबंधी नोटीस बजावली होती. त्यानंतरही बिल्डरने नियमबाह्य बांधकाम सुरू ठेवले होते. तत्कालीन पालिकेचे गटनेते महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम बंद करण्याच्या दिलेल्या आदेशांनाही हाफिज बिल्डरने काही दिवसांतच केराची टोपली दाखविली होती. परिणामी, मुख्याधिकारी रोहा यांनी हाफिज बिल्डरचे बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी नगरपालिकेच्या अवारात पर्ल पार्क विरोधात आमरण उपोषणही केले होते. त्या वेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी कारवाईची लेखी हमी दिल्याने उस्मान रोहेकर यांनी त्यांचे उपोषण थांबविले होते.
या इमारतीबाबत झालेल्या तक्रारींची जिल्हाधिकारी यांनीही दखल घेतली होती. इमारतीच्या आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल अभिप्रायासह तातडीने देण्याची सूचना रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना केली होती. या इमारतीची चौकशी न करताच जिल्हाधिकाºयांचे आदेश धाब्यावर बसवत पर्ल पार्क या बेकायदेशीर इमारतीला रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी होणाºया सिटिझन्स फोरमच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते आहे.
पर्ल पार्क इमारती संबंधित काही त्रुटी असल्या तरीही बांधकामास विकास नियंत्रण नियमावली अनुसार भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे.
- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, रोहा नगरपालिका
पर्ल पार्क इमारतीविरोधात १२ लेखी तक्रार अर्ज पुराव्यासहित पालिकेकडे केलेले आहेत. पूर्व मुख्याधिकाºयांनी नोटीस बजावून ही इमारत अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले असतानाही मुख्याधिकाºयांनी भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. ते बेकायदेशीर असून पुढे होणाºया सर्व कायदेशीर बाबींना ते स्वत: जबाबदार असतील.
- उस्मान रोहेकर, सामाजिक कार्यकर्ते रोहा.
ही इमारत बेकायदेशीर असून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर होत असल्याची तक्रार पुराव्यानिशी करून, या इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती, असे असताना मुख्याधिकाºयांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले असल्याने या विरोधात नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार करणार आहोत.
- समीक्षा बामणे, नगरसेविका