हत्याकांड प्रकरणाचा अवघ्या आठ तासांत तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:19 PM2020-12-17T23:19:11+5:302020-12-17T23:19:16+5:30
नेरळ पोलिसांनी लावला छडा; आरोपी दाम्पत्य अटकेत
n लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : गुन्ह्यातील फरार असलेले संबंधित आरोपी चार्स नाडार व त्याच्या पत्नीला मुंबईतील मीरा रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात कर्जतचे डीवायएसपी अनिल घेर्डीकर यांनी नेरळ-माथेरान आणि कर्जत येथील पोलीस ठाण्याचे पथक तयार केले होते, तर अलिबाग येथील एलसीबीलाही बोलावण्यात आले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधेदेखील घटनास्थळी हजर झाले होते.
नेरळ-रेल्वेस्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या मृतदेहाचे तुकडे करून या सुटकेसमध्ये भरण्यात आले होते. सुरुवातीला या मृतदेहाचे डोके सापडून न आल्याने मृत व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना खूप अडचणी येत होत्या. मृत व्यक्तीचे डोके हे उशिरा नेरळ पूर्व भागातील नाल्यात सापडून आल्याने पोलीस तपासाला वेग आला होता. यावेळी आरोपीने मृत व्यक्तीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य-तसेच सुटकेस व मद्यपी द्रव हे नेरळ येथील व्यापारी वर्गाकडून नेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर, गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागण्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फार मोठा उपयोग झाला होता. आरोपी नवरा-बायको असल्याचे पोलिसांसमोर येताच ते नेरळ येथील राजबाग येथील गृहप्रकल्पात गेली दोन वर्षे भाडेतत्त्वावर राहत आहेत. तर आरोपींनी मृत व्यक्तीस मारून त्याचे तुकडे सुटकेसमध्ये भरण्यात आल्यानंतरचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या माहितीच्या आधारावर नेरळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यावर मृत व्यक्ती ही वरळी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी असून त्याचे नाव सुशीलकुमार मारुती सरनाईक असल्याचे समोर आले.
सुशीलकुमार यांची ओळख आरोपी नाडार यांच्या पत्नीशी सोशल मीडियावर झाली होती. यातच सरनाईक नेरळ येथे भेटण्यासाठी येत होता. सरनाईक यांची हत्या नेमकी का व कशासाठी करण्यात आली हे अद्याप समोर आले नसून नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत.