रत्नागिरी जिल्ह्यात केला खून; मृतदेह टाकला रायगड जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:35 IST2025-03-20T12:34:32+5:302025-03-20T12:35:45+5:30
म्हसळा पोलिसांना सोमवारी सायंकाळी एक मृतदेह पोत्यात असल्याची माहिती मिळाली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात केला खून; मृतदेह टाकला रायगड जिल्ह्यात
म्हसळा : होळी उत्सवात झालेल्या वादानंतर दाेन कामगारांनी त्यांच्या मित्राला रॉडने बेदम मारहाण करत त्याचा खून करून मृतदेह गोणीत भरून तो पांगळोळी बंडवाडी येथे टाकला होता. याप्रकरणी पोलिसांनी संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य यांना बेड्या ठोकल्या आहेत.
म्हसळा पोलिसांना सोमवारी सायंकाळी एक मृतदेह पोत्यात असल्याची माहिती मिळाली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती; परंतु या मृत व्यक्तीच्या खिशात एक डायरी सापडली. या डायरीवर श्रीवर्धन तालुक्यातील कोंडापंचतन येथे राहणाऱ्या संतोष साबळे याचा क्रमांक होता. साबळे रस्त्याची कामे करणारा कंत्राटदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी साबळे याला ठाण्यात बोलावले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथील साबळे याच्या साइटवरून दोन कामगारांना अटक केली.