बोर्ली पंचतन : दिवेआगर येथे उत्तरेश्वर पाखाडी समुद्रकिनारी एका व्यक्तीचा खून करून मृतदेह गाडण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना ताब्यात घेत अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा तपास लावला आहे.
मुरुड तालुक्यातील मजगाव येथे वनकर्मचारी सुलेमान तडवी (५०) कार्यरत होते. त्यांचे सूचिता घाग हिच्याबरोबरच प्रेमसंबंध होते. सूचिता ही विवाहित असून तिचे पती रमेश घाग (५०) याच्याशी नेहमी वादविवाद व्हायचे. त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा निश्चय सूचिता आणि तडवी यांनी केला.
तडवीने पार्टी देण्याच्या बहाण्याचे ४ नोव्हेंबरला घाग दाम्पत्यास दिवेआगर येथे बोलावले. याठिकाणी समुद्रकिनाºयावर पार्टी केल्यावर तडवी आणि सूचिता यांनी अन्य एक साथीदार माजिद साखरकर यांच्या मदतीने रमेशवर लोखंडी रॉड व फावड्याच्या दांड्याने वार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह घनदाट झाडीत खड्डा खणून पुरला. हा सर्व प्रकार याठिकाणी लाकडे आणण्यासाठी गेलेल्या हमीद सादुल्ल याने पाहिला. मात्र दहा दिवसांनी हमीद यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कुणालाही शंका येऊ नये म्हणून सूचिताने पती हरविल्याची तक्रारही मुरु ड पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली. पोलिसांनी तपासानंतर सूचितासह साथीदार मजिदला अटक केली असून हत्येतील मुख्य आरोपी तडवीचा पोलीस शोध सुरू आहे.