सहा वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा लागला छडा; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची स्तुत्य कामगिरी
By राजेश भोस्तेकर | Published: March 18, 2024 02:50 PM2024-03-18T14:50:18+5:302024-03-18T14:51:31+5:30
जयेशच्या हत्येप्रकरणी दोन जण ताब्यात
राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : खालापूर तालुक्यातील रसायनी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जयेश काशिनाथ खुडे या २७ वर्षीय तरुणाच्या खुनाचा छडा सहा वर्षांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला आहे. जयेश यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी ओमकार सुनील शिंदे (२५) रां. वावंढळ, खालापूर आणि त्याचा साथीदार रोहित पाटील (२७) रा चांभार्ली या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. सहा वर्षापूर्वी झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी १८ मार्च रोजी अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनी संदीप पोमण उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात घडलेल्या काही खुनाच्या गुन्ह्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. अशा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक नेमले आहे. या पथकांच्या मार्फत उघड न झालेल्या खुनाचे गुन्ह्याचा तपास केला जात आहे. सपोनी संदीप पोमण यांच्या पथकाने रसायनी येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना उघडकीस आणला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चावणे गाव ते पेट्रो नॉस रस्त्यावर १३ एप्रिल २०१८ साली रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञातांनी जयेश यांच्या अंगावर धारदार शस्त्राने अनेक वार करून मृतदेह नाळ्यामध्ये फेकून दिला होता. ही माहिती कळताच रसायनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ३०२ प्रमाणे अज्ञात मारेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास लागला नव्हता. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ओमकार शिंदे याला ३२६ अन्वये अटक ही झाली होती. मात्र खुनाच्या बाबतीत त्याचा सबंध आहे अशी तसूभरही कल्पना पोलिसांना नव्हती. त्यानंतर तो सुटून बिनधास्त वावरत होता.
उघड न झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अखेर एका खबऱ्याच्या माहितीने स्थानिक गुन्हे विभागाचे सपोनी संदीप पोमण यांना २०१८ साली झालेल्या जयेश याच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार सहा फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार ओमकार याला ताब्यात घेतले. पोलिसी इंगा दाखवल्यानंतर रोहित पाटील या आपल्या साथीदारांचे नाव घेतले. त्यालाही पथकाने कर्जत, जामखेड, अहमदनगर येथून ताब्यात घेतले. पैशाच्या वादातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
लिफ्ट देऊन त्याला संपवले
जयेश यांची हत्या का केली याची स्पष्ट कबुली आरोपींनी दिलेली नाही आहे. मात्र पैशाच्या वादातून खून केल्याचे आरोपी म्हणत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मयत याला मोटार सायकल वरून लिफ्ट देऊन घटनास्थळी आल्यानंतर त्याच्यावर हत्याराने वार करून संपवले होते. त्यानंतर दोघेही पळाले होते. यातील एकजण आरोपी हा रियल इस्टेट एजंट असून दुसरा सॉफ्ट वेअर इंजिनियर असल्याची पार्श्वभूमी आहे.