मुरुड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:36 PM2020-09-22T23:36:48+5:302020-09-22T23:37:17+5:30
नव्या उमेदीने कामाचा शुभारंभ : कर्ज काढून घेतल्या नवीन हातगाड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड : मुरुड समुद्रकिनारी सुमारे ४४ टपरीधारक असून, या लोकांचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता या टपरीधारकांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्याही बनवण्यात आल्या असून, पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.
चहाटपरी त्याचप्रमाणे, अल्पोहर व भोजन बनवून देणाऱ्या सर्व टपºया संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने या भागात रेलचेल दिसून येत आहे. अल्प प्रमाणात पर्यटकही दाखल होत असल्याने, या टपरीधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अनेक टपरीधरकांनी सांगितले की, पाऊस कमी असेल, तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात, परंतु मुसळधार पाऊस पडत आमच्या व्यवसायात मोठी घट झाली आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटक संख्या वाढून व्यवसाय सुरळीत होतील, असे टपरीधारकांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाची मदत अनेक टपरीधारकांना मिळालेली नाही, तरीही मोठ्या प्रमाणात दुकाने उघडण्यात आली आहेत. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्रीवादळात बहुतावशी टपऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यातील काही टपरीधारकांनी कर्ज काढून आपल्या हातगाड्यांची दुरुस्ती करून घेतली आहे, तर काही जण दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. कठीण परस्थिती असतानाही आपले दु:ख विसरून टपरीधारकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान
भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.