मुरुडमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:54 AM2019-06-21T00:54:39+5:302019-06-21T00:54:50+5:30
२० वर्षे नाल्यासाठी संघर्ष; पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग रोखल्याने संताप
आगरदांडा : मुरुड-शेगवाडा येथील नेताजी सुभाषचंद्र मार्गावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी गेली २० वर्षे नागरिकांचा नाल्यासाठी संघर्ष चालू आहे. मुरुड आगार, गणेश पाखाडी, भोगेश्वर पाखाडी आदी भागातून वाहणारे पावसाचे पाणी शेगवाडा येथील मुख्य नाल्यातून समुद्रात जाते. मात्र, मुरुड नगरपरिषदेने या मुख्य नाल्यात चार सिमेंटचे पाइप टाकून वर बांधकाम करून पाण्याचा प्रवाह खंडित केला आहे. त्यामुळे नाल्याचा आकार कमी झाल्याने हे मोठा पाऊस झाल्यास हे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी संतप्त होऊन गुरु वारी मुरुड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना तसेच प्रभागातील नगरसेवकांना घेराव घातला.
मुरुड नगरपरिषदेने या नाल्यावरील केलेले बांधकाम हे नगरपरिषदेने प्रमाणित केलेल्या प्रारंभ प्रमाणपत्र अन्वेय जमिनीपासून आठ फूट उंची व २० फूट रुंदी करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपरिषदेने हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह शेगवाडा बागायतीत व घरांमध्ये शिरून आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तरी बांधलेले बांधकाम दोन दिवसांच्या आत नगरपरिषदेने न तोडल्यास आम्ही ते बांधकाम तोडू, असा इशारा मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कार्यालयामध्ये शेगवाडातील नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना घेराव घालून दिला. संदर्भात जाब विचारण्यात आला आहे. शेगवाडा येथील नाल्याबाबत निवेदन देऊनसुद्धा उपाययोजना झाली नाही. आमचा प्रश्न स्थानिक नगरसेविकांनी सभेमध्ये मांडला पाहिजे होता. मात्र, सभेमध्ये विषय मांडला गेला नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
नाल्याचे बांधकाम साइटची उंची आठ फूट ठेवायची आहे. स्लॅब व जमीन या मध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम केल्याने येणाºया पावसात पुन्हा नागरिकांचे हाल होऊन आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. १४ जून २०१९ च्या जनरल सभेत याबाबत विचार केला जाईल, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते; परंतु या अर्जाचा जनरल सभेत साधा विचारही न केल्यामुळे नागरिकांनी जाब विचारला.
या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटनेते मुग्धा जोशी, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेवक प्रमोद भायदे, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रमंडळ अध्यक्ष सुधीर पाटील आदीसह शेगवाडातील नागरिक उपस्थित होते.
सभेत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन
मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न के ला, तेम्हणाले की ज्या वेळी बांधकाम चालू होते, त्या वेळी स्थानिक नागरिकांनी काम बंद करायला पाहिजे होते. त्यावर स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आम्ही निवडून दिलेल्या स्थानिक नगरसेवकांचे काम होते, त्यांना माहीत आहे की नाल्याचा ज्वलंत प्रश्न शेगवाडीतील नागरिकांना सतावत आहे. हा विषय त्यांनी मांडणे आवश्यक होता. हा संघर्ष गेले २० वर्षे चालू आहे. होणाºया आर्थिक नुकसानाला नगरसेवक जबाबदार राहतील, असा इशारा नागरिकांनी दिला. या संदर्भात ताबडतोब विशेष जनरल सभा लावून योग्य तो निर्णय तुम्हाला देऊ, असे आश्वासन या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिले.
येत्या दोन दिवसांत बांधकाम तोडले नाही तर हे काम येथील नागरिक तोडून टाकतील, असा इशारा दिला आहे. यामुळे नगरपरिषद या बाबतीत कोणता निर्णय घेणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
नाल्याचे बांधकाम करताना स्लॅब व जमीन यामध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम के ले आहे.