मुरुड नगरपरिषद जिल्ह्यात तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:15 AM2018-06-29T03:15:28+5:302018-06-29T03:15:32+5:30
केंद्र शासनामार्फत देशातील सर्व नगरपरिषदांकरिता स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुरुड जंजिरा : केंद्र शासनामार्फत देशातील सर्व नगरपरिषदांकरिता स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतातील ३४०० शहरांमधून ३३ वा, पश्चिम विभागातील एक हजार शहरामधून २१ वा नंबर मुरुड जंजिरा नगरपरिषदेने प्राप्त केला आहे.
स्पर्धेमध्ये शहरातील प्रत्येक घरातून कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे, सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करून स्वच्छता राखणे, स्वच्छतेबाबत जनजागृती ृयाबाबींची पाहणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून मुरुड नगरपरिषदेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात रायगड जिल्ह्यात मुरुड नगरपरिषदेचा तिसरा क्रमांक आला आहे.
या स्पर्धेत पहिल्या ५० क्रमांकामध्ये येणाऱ्या नगरपरिषदेस शासनाकडून पाच कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. मुरुड नगरपरिषदेस ते प्राप्त होणार आहे.
या मिळालेल्या यशाबद्दल नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले की,मुरुड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरी नागरिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. नगरपरिषदेने सांगितल्याप्रमाणे ओला व सुका कचरा हा वेगवेगळा करून कचरा पेटीत टाकत होते. त्यांच्या सहकार्यामुळेच मुरुड नगरपरिषदेस यश प्राप्त करता आले आहे. स्वच्छता अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेले नगरपरिषद अधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवकांचे सुद्धा सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.