आगरदांडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान मोहीम राबवली जात आहेत. मुरुड तालुक्यातील सर्वाधिक शासकीय कामे मुरुड तहसील कार्यालयात होत असतात आणि तो परिसर स्वच्छ असावा, या तहसीलदार गमन गावित यांच्या विनंतीनुसार प्रतिष्ठानतर्फे ९७ श्रीसदस्यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता तहसीलदार कार्यालयाचा परिसर स्वच्छ के ला. ११ वाजेपर्यंत कार्यालयाच्या परिसरातून १४ टन कचरा निघाला. निवासस्थान परिसरही स्वच्छ केला.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीनुसार भारतात राहणाऱ्या नागरिकांचे प्रथम कर्तव्य आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हे आहे. स्वच्छतेमुळे परिसरातील युवांचे स्वास्थ सुदृढ राहते. रोगराई पसरत नाही. आपले शहर सुंदर, तर तालुका सुंदर व नंतर देश सुंदर व स्वच्छ राहतो, म्हणूनच धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सतत स्वच्छता मोहीम राबवली जाते. उन्हाळ्यात विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. किनारे, स्मशानभूमी, धरणे, स्वच्छ करून देशसेवेचे काम प्रतिष्ठान करत आहे.