मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेंतर्गत धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यात आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. कोरडे पडलेले तलाव, धरणातील गाळ काढून तो शेतीत टाकल्यास शेतीची पत सुधारून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले.
धरणातील व तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढेल, आणि पाणीटंचाईवर मात करता येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. जमिनीची पाणी क्षमता वाढवण्यासाठी गाळ मुक्त धरण व गाळ युुक्त शिवार ही योजना राबवली जात असून यामध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून तालुक्यातील कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढल्यामुळे पाण्याची सिंचन क्षमता वाढणार असून मे अखेर पर्यंत पाणी उपलब्ध होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. या योजनेत स्थानिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले. विहूर येथील धरण, सावरोली येथील तलाव, उसरोळी येथील तलाव, मजगाव व शीघ्रे आदी ठिकाणची गाळ काढण्याची कामे सुरु असल्याची माहिती परीक्षित पाटील यांनी दिली. धरणातील व तलावातील गाळ काढल्यानंतर तो फक्त शेतकऱ्यांनाच दिला जात आहे. उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी या कामात मोठा सहभाग घेतला आहे. त्यांनी विहूर व उसरोली येथील तलावातील गाळ काढून हातभार लावला आहे. हा एक उत्कृष्ट उपक्रम असून भविष्यात पाणीटंचाई भासू नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.लोकसहभाग वाढल्याने कामास गतीमुरुड तालुक्यात धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून लवकरच सर्व कामे पूर्ण होणार आहेत. लोक सहभाग लाभल्याने कामाची गती सुद्धा वाढली आहे. गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून यांचा मोठा फायदा शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे. गाळ काढण्यासाठी शासनाकडून जेसीबीसाठी डिझेल अनुदान दिले जाते.