आगरदांडा : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांचा प्रचार गेल्या महिन्यापासून करीत आहेत. मुरूड तालुक्यातील ६१ मतदान केंद्र आहेत व त्यामधील राजपुरी, मिठागर, आदाड हे संवेदनशील मतदान कें द्रे असूनया ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडावी व मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे, यासाठी प्रशासनासोबत पोलीस विभागदेखील सज्ज झाला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषदसाठी दोन जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समितीसाठी चार जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या वेळी ४८,८४७ एवढे मतदाते असून त्यामध्ये २४,५०९ पुरुष व २४,३३८ स्त्री मतदार आहेत. हे मतदान किती टक्के मतदान होईल त्यावरून उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदानयंत्राची तपासणी करण्यात आली आहे. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली आहेत. मतदान यंत्रामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याकरिता क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सुरू करण्यात येतील. (वार्ताहर)
मुरूड तालुक्यात ६१ मतदान कें द्रे
By admin | Published: February 21, 2017 6:18 AM