मुरूड तालुका आणखी आठ दिवस अंधारात राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:13 AM2020-06-14T00:13:47+5:302020-06-14T00:13:56+5:30
तालुक्यातील वीज गेल्या १२ दिवसांपासून गायब
मुरूड जंजिरा : मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे अतोनात नुकसान होऊन ६५० पेक्षा जास्त पोल निकामी तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्यामुळे तालुक्यातील वीज गेल्या १२ दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील ७२ गावे व मुरूड शहर अंधारात आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून येथे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु तोच न्याय मुरूड तालुक्याला देता आलेला नाही. आज गेल्या अनेक दिवसांपासून हा तालुका अंधारात आहे. त्यामुळे विविध बँका व आर्थिक संस्थांचे कामकाज ठप्प आहे. ज्या ठिकाणी वादळाचा फटका बसला नाही तेथील वीज कर्मचाऱ्यांकडून मुरूडला जास्त कुमक दिली जाईल, असे फक्त आश्वासन दिले गेले.
प्रत्यक्षात मात्र ठाणे विभागातून फक्त १५ कर्मचारी आले, त्यातील पाच वयोवृद्ध असल्याने पोल खेचण्याच्या कामात ते मदत करू शकत नाहीत. त्यानंतर मात्र अद्याप तरी कर्मचारी वर्ग न आल्याने मुरूड अंधारातच असून अजून पुढील अनेक दिवस अंधारातच राहणार आहे.
मुरूडचे तहसीलदारसुद्धा याचा आढावा घेत नाहीत. वीज अधिकारी सांगतील तेच ग्राह्य मानल्यामुळे वीज येण्यास खूप उशीर होत आहे. लोकप्रतिनिधी वीज मंडळास धारेवर धरत नसल्याने मुरूड तालुक्याला शंभर टक्के वीजपुरवठा होणार नाही हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.
याबाबत मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी सांगितले की, पाबरे येथील मुख्य वाहिनी मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यास मुरूड उपकेंद्रातून सर्व तालुक्याला वीजपुरवठा सुरू करणे सोपे जाणार आहे. विजेचे खांब उभे करण्यासाठी स्थानिक ठेकेदार व डिव्हिजनकडून अतिरिक्त माणसे मागवण्यात आली असून लवकरात लवकर मुरूडला वीजपुरवठा होण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत.