मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा; युवकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:12 AM2020-11-28T03:12:11+5:302020-11-28T03:12:20+5:30

नगर परिषदेने पुढाकार घेण्याची मागणी

Murud taluka waiting for stadium; Disadvantages of youth | मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा; युवकांची गैरसोय

मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा; युवकांची गैरसोय

googlenewsNext

मुरुड : तालुक्याला क्रीडांगण हे मुरुड शहराच्या जवळच असावे जेणेकरून सर्व खेळाडू त्या क्रीडांगणावर येऊन आपला सराव करतील व सर्वोत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील. परंतु गेली अनेक वर्षे क्रीडांगणाचा हा प्रश्न अनुत्तरित असल्याने युवकांना शहरात खेळण्याचे चांगले क्रीडांगण उपलब्धच झालेले नाही. मुरुड नगर परिषदेकडूनसुद्धा या प्रश्नाबाबत फारसे गांभीर्याने न पाहिल्यामुळे शहरात क्रीडांगण होऊ शकलेले नाही. सर्व युवावर्गाला शहरालगतची जागा अपेक्षित असून नगर परिषदेने पुढाकार घेऊन क्रीडांगण जागा मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

मुरुड तालुक्यातील विहूर हे क्रीडा संकुल गेल्या ७ वर्षांपासून रखडले आहे. ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडागुणांचा विकास व्हावा. त्यांच्या नैपुण्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने क्रीडा धोरण राबविले आहे.

पुरोगामी राज्यात ११ जिल्ह्यांत क्रीडा प्रबोधिनी स्थापन झाल्या असून, रायगड जिल्ह्यातही प्रबोधिनी कार्यान्वित व्हावी. लोकप्रतिनिधींनी मुरुडसारख्या ग्रामीण डोंगरी भागात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अलीकडे प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुल उभारण्याची जोरदार तयारी सुरू असून क्रीडा क्षेत्रावर राज्य शासनाने फोकस केल्याचे दिसत आहे. मुरुड नगर परिषदेच्या माध्यमातून वसंतराव नाईक कॉलेजच्या जवळ सुमारे पाच एकर खासगी जागा आरक्षित आहे. त्या जागेवर प्रस्ताव मंजूर झाल्यास मुरुड नगर परिषद चटई क्षेत्राच्या ४० टक्के वाढीव बांधकामाला भूखंडधारकांना परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव मुरुड नगर परिषदेने तातडीने अंमलात आणावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

नगर परिषदेची वसंतराव महाविद्यालयाजवळ आरक्षित जागा 

n  मुरुड नगर परिषदेची वसंतराव महाविद्यालयाजवळ आरक्षित जागा आहे. या आरक्षित जागेत क्रीडांगण करण्यासाठी शेतकरी किंवा बागायतदार यांना आताच्या मार्केटप्रमाणे मूल्य देणे आवश्यक आहे. 

n यासाठी नगर परिषद टाऊन प्लानिंग ऑफिस व संबंधित शेतकरी यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

n परंतु शासन जमीन खरेदी करण्यासाठी पैसे देत नाही. त्यासाठी नगरविकास विभागाने पर्यायी मार्ग सुचविलेले आहेत. याचा अभ्यास करून वाटचाल केल्यास मुरुड शहरात भव्यदिव्य क्रीडांगण साकारू शकते. 

क्रीडांगणाविषयी आम्ही गांभीर्याने विचार करत असून मुरुड शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुका क्रीडांगणासाठी जागा अशी असावी की अधिकाधिक खेळाडू सहजपणे एकत्र येतील.
- संजय महाडिक,
 जिल्हा क्रीडाधिकारी, रायगड

Web Title: Murud taluka waiting for stadium; Disadvantages of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड