मुरुड तालुक्याला स्वीचिंग उपकेंद्र बसणार !
By admin | Published: September 29, 2015 01:22 AM2015-09-29T01:22:06+5:302015-09-29T01:22:06+5:30
मुरुड तालुक्यासाठी रोहा धाटाव येथून वीजपुरवठा केला जातो, मात्र तिथून कमी दाबाचा पॉवर सप्लाय होत असल्याने व तेथील वीजपुरवठा करणाऱ्या फिडरवर अतिरिक्त ताण
आगरदांडा : मुरुड तालुक्यासाठी रोहा धाटाव येथून वीजपुरवठा केला जातो, मात्र तिथून कमी दाबाचा पॉवर सप्लाय होत असल्याने व तेथील वीजपुरवठा करणाऱ्या फिडरवर अतिरिक्त ताण येत असल्याने मुरुड तालुक्यात वीज वारंवार खंडित होते. यामुळे मुरुड तालुक्यातील लोकांना संपूर्ण अंधारात राहावे लागते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवून विद्युत वितरण कंपनीला तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीना नागरिकांच्या रोषास सामोर जावे लागते. याचीच दखल घेऊन आमदार पंडित पाटील यांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवून सबस्टेशन मंजूर करुन घेतले, त्यांच्या या मागणीला यश आले असून लवकरच मुरुड येथील स्वीचिंग उपकेंद्र बसविण्यात येणार असून येथील नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याची समस्या दूर होणार आहे. गेले कित्येक वर्षे विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेला मुरुड व ग्रामीण भाग अखेर या लपंडावातून मुक्त होणार असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र फिडर बसविणार आहेत. आगरदांडा, ग्रामीण भाग, मुरुड, नांदगाव असे या भागात स्वतंत्र फिडर बसविण्यात येणार आहेत.
मुरुड तालुका पर्यटन क्षेत्र असल्याने येथे लाखो पर्यटक ये - जा करत असतात. मुरुड शहर विकासाच्या वाटेवर आहे अनेक व्यापारीवर्ग, हॉटेल्स, छोटे - मोठे उद्योग या परिसरात चालत आहेत. यामुळे साहजिक या उद्योगांसाठी विजेची व्यवस्था खूप महत्वाची ठरते. म्हणूनच वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे येथे छोटे -मोठे मोर्चे काढण्यात आले होते. या संदर्भातील प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार पंडित पाटील यांनी जातीने लक्ष घातल्याने आता मुरुड तालुकासाठी हा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. (वार्ताहर)