मुंबईकरांच्या सोयीसाठी झाली मुरुडकरांची गैरसोय; चालक-वाहकांची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:10 AM2020-12-02T00:10:34+5:302020-12-02T00:10:59+5:30
एसटीच्या चालक, वाहकांना मुंबईत सेवा देण्यासाठी पाठविल्याने स्थानिकांची अडचण
मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यसाठी राज्य शासनाने मुंबई उपनगरांना जोडणारी रेल्वे सेवा बंद ठेवल्याने कामावर जाणाऱ्या असंख्य नोकदारांना एसटीद्वारे सेवा दिली जात आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून २५ ते ३० चालक, वाहक मुंबई आगारात समाविष्ठ करण्यात येऊन एसटीद्वारे मुंबईकरांची सोय केली जात आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आगारातून चालक, वाहक मुंबईला गेल्याने गाड्या उपलब्ध असताना, आता प्रत्येक आगाराला चालक-वाहक उपलब्ध नसल्याने नियोजित गाड्या रद्द कराव्या लागत आहे. जिथे २४ फेऱ्या मारल्या जायच्या, तेथे आता फक्त दहा फेऱ्या होत आहेत. ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात आल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी दिवसाला तीन गाड्या सुटत असत, तेथे आता एखादी गाडी सोडण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात प्रत्येक आगारातील माणसे मुंबईला सेवा देण्यास गेली, परंतु ग्रामीण व तालुका स्थरावरील सेवा साफ कोलमडली आहे.
मुंबईतून निघालेला माणूस अलिबागपर्यंत येतो व कित्येक तास खोळंबून राहतो. जोपर्यंत मुंबई गाडी येत नाही, तोपर्यंत त्याला आपले घर गाठता येत नाही. गाड्यांची संख्या कमी झाल्याने प्रवास खूप महागाचा पडत आहे.
नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांवर ताण
एसटीने खूप वर्षांत नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांच्या जिवावर त्यांचा कारभार निर्भर आहे. उपलब्ध संख्या खूप कमी असल्याने त्यातच मुंबईला मोठ्या संख्येने माणसे रवाना झाल्याने स्थानिक पातळीवरची एसटी सुविधा ढासळलेली दिसून येत आहे.
अनेक गाड्या रद्द, नेमक्याच गाड्यांमुळे वेळेवर न सुटणे, तासंतास वाट पाहावी लागणे हे चित्र सध्या सर्वच आगरात पाहावयास मिळत आहे. अशा अनेक त्रासांमुळे प्रवासी त्रस्त झाला आहे, परंतु सुधारणा होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने हा त्रास प्रवाशांना दीर्घकाळ सोसावा लागणार आहे.