मुरूडचा सभापती चिठ्ठीवर ठरणार?
By Admin | Published: March 9, 2017 02:24 AM2017-03-09T02:24:32+5:302017-03-09T02:24:32+5:30
मुरुड पंचायत समितीसाठी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस यांना एक एक जागा, तर शिवसेनेला दोन
आगरदांडा : मुरुड पंचायत समितीसाठी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस यांना एक एक जागा, तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. यामुळे सभापती निवडीत पेच निर्माण झाला आहे. यामुळे चिठ्ठीवरच सभापती ठरणार का? की फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळेल याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता असून येत्या १४ मार्च होणाऱ्या सभापती निवडीकडे मुरुड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुरुड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अटीतटीने झाली. प्रथमच मुरुड तालुक्यात चौरंगी लढती पक्षाच्या चिन्हावर झाली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस, त्यामधील भाजपा पक्षाने ग्रामीण भागातून जवळपास अधिक मते घेतली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी शिवसेनेने चांगली मुसंडी मारली असे दिसून आले, त्यानुसार महाआघाडीला दोनच जागा निवडून आणण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीनंतर पंचायत समितीत आता महाआघाडीला आणि शिवसेनेला समान जागा आहेत. त्यामुळे सभापती कोणाचा याकडे लक्ष लागून आहे. अडीच-अडीच वर्षे सभापतीपद असाही समझोता होऊ शकतो, अन्यथा चिठ्ठीवरच सभापतीपदाची निवड करावी लागणार आहे. महाआघाडीमधून सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अशिका ठाकूर हे नाव निश्चित झाले, तर आय काँग्रेस उपसभापतीसाठी प्रणिता पाटील, शिवसेनेकडून नीता घाटवळ हे नाव निश्चित झाले आहे. (वार्ताहर)
- १४ मार्चला ही निवडणूक मुरु ड दरबार हॉल येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ असून, दुपारी २ वाजता सभापती निवड व उपसभापती बैठक होणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर सभापती-उपसभापतीची निवड के ली जाईल, असेतहसीलदार दिलीप यादव यांनी सांगितले.