अवैध कत्तलखान्यांविरोधात महाडमध्ये मुस्लीम बांधव एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:18 AM2018-08-16T02:18:48+5:302018-08-16T02:19:00+5:30
महाडमध्ये गेली काही महिन्यांत अवैध कत्तलखान्यांवर गोवंश हत्येच्या घटना पोलिसांनी केलेल्या धाडीमध्ये उघड झाल्या आहेत.
दासगाव - महाडमध्ये गेली काही महिन्यांत अवैध कत्तलखान्यांवर गोवंश हत्येच्या घटना पोलिसांनी केलेल्या धाडीमध्ये उघड झाल्या आहेत. यामुळे मुस्लीम समाजाची बदनामी होत असून दोन समाजातील सामाजिक सलोख्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाडमधील मुस्लीम समाजाने या अवैध कत्तलखान्याविरोधात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुस्लीम समाजाने अवैध कत्तलखान्यांचा निषेध व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली.
महाडमध्ये गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी गोवंश हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये स्थानिक नागरिकांचा काहीएक संबंध नसून बाहेरून येणारे पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्थानिक तरुणांना हाताशी धरत असे प्रकार करीत आहेत, यामुळे सामाजिक सलोखा कायम राहावा याकरिता मुस्लीम समाजाने आज एक बैठक घेतली. या बैठकीचे आयोजन मुस्लीम एकता समिती, आवाज ग्रुप महाड, अमन फलाह कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ही बैठक महाड पोलादपूर मुस्लीम एकता कमिटीचे अध्यक्ष अल्फला देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी आवाज ग्रुपचे अध्यक्ष महंमदशफी पुरकर, मुस्लीम एकता समितीचे सचिव मन्सुर देशमुख, अॅड. कादीर देशमुख, हसनखान झटाम, गणी धामणकर, छावा संघटनेचे अध्यक्ष मुदस्सीर देशमुख, अखलाख गोडमे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्वानुमते गोवंश हत्येचा निषेध नोंदवण्यात आला. महाडमधील मुस्लीम समाजाचा या घटनांशी काहीएक संबंध नसून यामध्ये स्थानिक मुस्लीम नाहक बदनाम होत आहे. पोलीस प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
या वेळी महाड पोलादपूर मुस्लीम एकता समितीचे मन्सुर देशमुख यांनी महाडमध्ये बाहेरून येऊन काही लोक तालुक्यातील शांतता भंग करीत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली गेल्यास तालुक्यातील गुण्यागोविंदाने राहणाºया हिंदू-मुस्लीम समाजाची एकता आबादित राहणार आहे. दोन्ही समाजात गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, असे देखील मन्सुर देशमुख यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अल्फला देशमुख यांनी शासनाने गोवंश हत्या बंदीच्या निर्णयाचे मुस्लीम समाज पालन केले जाईल व अशा प्रकारचे कृत्य करत असलेल्या लोकांवर समाज देखील पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.
या वेळी मुदस्सीर पटेल, फैजल चांदले, अकबर खाजे, अशरफ कापडी, गोडमे यांनी देखील आपल्या मनोगतातून झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवला.