निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: परमेश्वराशी निष्ठा, त्याग, समर्पण व बंधुत्वाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात, बकरी ईद सोमवारी शांततेत साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाजपठण करतेवेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. जिल्ह्यातील २४५ ठिकाणी नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही मुस्लिम बांधव रक्तदान करून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. गोरेगाव येथील प्राथमिक शिक्षक नूरखॉं पठाण दरवर्षी बकरी ईद विधायक पद्धतीने साजरी करतात. बकरी ईदनिमित्त एखाद्या प्राण्याची कुर्बानी देण्यापेक्षा दरवर्षीप्रमाणे या वर्षी आर्थिक कुर्बानी देत त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.