रात्री भावाचं कुटुंब संपवलं अन् सकाळी आरतीला लावली हजेरी; कर्जत हत्याकांडाचे गूढ उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:35 PM2024-09-10T17:35:03+5:302024-09-10T17:35:15+5:30
कर्जतमधील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मृताच्या भावाला अटक करण्यात आली आहे.
Raigad Crime : कर्जतमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पती-पत्नी आणि मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह एका ओढ्यात फेकण्यात आले होते. आता या प्रकरणाचा उलघडा झाला आहे. या तिहेरी हत्याकांडा प्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ आणि वहिनीला पोलिसांनी अटक केली आहे. भावानेच तिघांचीही कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या सगळ्यासाठी मोठी तयार केली असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे विभागाला यश आलं आहे. तिघांची हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. सख्ख्या भावानेच घराच्या मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाचे संपूर्ण कुटुंबाला संपवल्याचे समोर आलं आहे. हे कृत्य अत्यंत क्रुर असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हटलं आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकण पाडा येथे राहणारे ३५ वर्षीय तरुण मदन पाटील, त्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या तिघांची हत्या करण्यात आली होती. ग्रामस्थांना दशक्रियेच्या विधीसाठी जात असताना तिघांचे मृतदेह घराजवळ असलेल्या ओहोळामध्ये रविवारी सकाळी सापडले होते. तिघांवरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसत होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, रायगड पोलिसांनी मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हनुमंत पाटील व त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
घराच्या मालमत्तेच्या वादातून हनुमंत पाटील याने आपल्या सख्ख्या भावाचे संपुर्ण कुटुंब संपवले. आरोपी हनुमंतने भाऊ मदन, त्यांची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिषा पाटील आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा हे रात्री आपल्या घरात गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. या प्रकरणाच्या तपासासाठी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा ज्ञानेश्वर टेळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पाच पथके तयार करण्यात आली होती.
दरम्यान, तिघांच्या हत्येसाठी हनुमंतने मोठी तयारी केली होती.आरोपी हनुमंत हा चिकनपाडा गावापासून तीन किमीवरील पोशीर येथे मामाच्या घरी गणेशोत्सवासाठी गेला होता. कारण गणेशोत्सवानिमित्त आपण रात्रभर मामाच्या घरी असल्याचे भासविण्याचा त्याचा प्रयत्न केला. मामाकडे रात्रीचे जेवण घेऊन आपल्या मामाला आपण माळ्यावर झोपण्यास जातो असं त्याने सांगितले. त्यानंतर रात्री मदन पाटील यांच्या घरी जाऊन तिघांची हत्या केली. त्यानंतर आरोपी हनुमंत पुन्हा मामाकडे येऊन झोपला आणि सकाळी सहा वाजता गणपती पुजेसाठी देखील उपस्थित राहिला.
मात्र या हत्याकांडानंतर पोलिसांनी सर्वांची चौकशी सुरु केली तेव्हा त्यांना हनुमंतवर जास्त संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडावउडवीची उत्तर दिलं. हत्येची दिवशी आरोपीने रात्री पांढरा शर्ट घातला होता. मात्र सकाळी तो टी शर्टवर होता. तसेच पोशीर ते चिकन पाडा इथल्या रस्त्यातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी हनुमंत जाताना दिसला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हनुमंतने हत्या केल्याच कबुल केलं.