नगरपंचायत निवडणुकीचे वेध
By admin | Published: November 30, 2015 02:24 AM2015-11-30T02:24:23+5:302015-11-30T02:24:23+5:30
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे
म्हसळा : नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कोण होणार म्हसळा नगर पंचायतीचा नगराध्यक्ष, यावर देखील तर्क-वितर्क तालुक्यात सुरू आहेत. मी नगरसेवक होणारच या भूमिकेत असणाऱ्या काहींचा आरक्षण जाहीर होताच हिरमोड झाला आहे.
निवडणुकीसाठी ५० टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असल्याने १७ सदस्यांपैकी तब्बल ९ सदस्या या म्हसळ्यातील रणरागिणी महिला नगरपंचायतीत असणार आहेत. म्हसळा नगरपंचायतीत महिलाराज दिसणार आहे हे त्रिवार सत्य आहे. पुढच्या काही दिवसात नगरपंचायतीच्या निवडणुका होणार हे लक्षात ठेवून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष जोमाने कामाला लागला आहे. म्हसळा येथे शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस मजबूत आहे. याच हिंमतीवर शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्याचा निर्धार केला आहे.
आज म्हसळ्यातील राजकीय स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असली तरी कॉँग्रेस आणि भाजपाचे तगडे आव्हान या दोघांना पेलावे लागणार आहे. त्यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नाराजांनी वेगळी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीची निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की आहे. अजून तरी कुठल्याही पक्षाची युती झाली नसून सर्व पक्ष स्वबळावर लढणार असे चित्र आहे.
(वार्ताहर)