- निखिल म्हात्रेअलिबाग - कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेसोबत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील साजगावची यात्रा सुरू होते. यानंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची भरते. या प्राचीन काळापासून चालत आलेल्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. यात्रेला रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या यात्रेची शेतकरी वर्ग मोठ्या आशेने वाट पाहत असतात, नागेश्वर यात्रेचे खास आकर्षण म्हणजे बैलगाडी आहे, या यात्रेत शेतकरी आपली बैलगाडीतून दर्शनाला येतात, यामुळे यात्रेला विशेष महत्त्व आहे. तर मापगाव येथील श्री क्षेत्र कनकेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेला प्राचीन काळापासून भरणाऱ्या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षांपासून हि कनकेश्वरची यात्रा दोन दिवस भरत आहे. यावेळी आवास येथील नागेश्वरची यात्रा शनिवार दि. २५ नोव्हेंबरला होणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ व २७ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला मापगाव येथील श्री. क्षेत्र कनकेश्वरची यात्रा होणार आहे.
या यात्रांची चतुरचातकप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह भाविकांमध्ये तसेच लहानमुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांच्या आवडीचे उंच आकाश पाळणे, ब्रेकडान्स, खेळणी आदी मनोरंजनाची साधने तसेच मिठाईसोबत खाऊंची विविध प्रकारची दुकाने याचा आस्वाद घेण्यासाठी मुले आसुसलेली आहेत. यात्रा महोत्सवात कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी आवास ग्रामपंचायत व मापगाव ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे.