रेवदंडा : नागांव - हटाळे येथे पुरातन असे शिवलिंगाचे नागेश्वर मंदिर आहे. पहिल्या श्रावण सोमवारमुळे या मंदिराची स्वच्छता केली जात असून मंदिरात सजावटही करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी भक्तांच्या दर्शनासाठी येथे रांगा लागतात. तशाच रांगा सोमवारी सकाळपासून पाहावयास मिळणार असून भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे मंदिर शिवकाळातील असावे, त्याचा जीर्णोद्धार जानेवारी १७७२ मध्ये राघोजी आंग्रे सरखेल यांनी केला, तर १७७३ मध्ये त्यांनी एक भव्य तलाव पुढे बांधला. तलावाच्या सर्व बाजू चिरेबंदी व तांबड्या दगडाच्या आहेत. मंदिरात लाकडी नक्षीकाम केले असून, छप्पर कौलारू आहे. मुख्य गाभारा व कळस यांचे काम दगडी चिरेबंदीत पाहण्यासारखे असून मुख्य सभागृहाच्या कमानींची दगडी रचना अष्टकोनी आहे. मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा एका पाषाणात कोरलेला आहे. शिवलिंगाच्या गाभाऱ्यात शिरताना नंदी आहे, खोलगट भागात काळ्या पाषाणात शिवपिंडी असून मागील बाजूस पार्वतीची संगमरवरी मूर्ती आहे. बाहेरील बाजूस डावीकडे गणेशमूर्ती तर उजवीकडे काळभैरवाची चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या चार हातात शिर, पात्र, त्रिशूल आणि डमरू असून गळ्यात कवड्यांची माळ आहे. व्याघ्रचर्म गुंडाळलेल्या या मूर्तीच्या पायाशी दोन कुत्री आहेत. समोरच दीपमाळ आहे. श्रावण महिन्यात स्थानिक ग्रामस्थ जागरण सप्ताह करतात. सप्ताहाची सांगता पालखीने होते. दर सोमवारी अभिषेक व अन्य धार्मिक विधीसाठी भक्तमंडळीची गर्दी असते. सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीला असतो. रात्री पालखी सोहळा हे आकर्षण असते. (वार्ताहर)
शिवकालीन हटाळेमधील ‘नागेश्वर मंदिर’
By admin | Published: August 16, 2015 11:40 PM