नागोठणेत कोरोनाबाबत खासदारांनी घेतला आढावा, उपाययोजनांबाबत केल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 01:00 AM2020-07-06T01:00:42+5:302020-07-06T01:01:23+5:30
रोहा तालुक्यात कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शनिवारी खा. तटकरे यांनी रोहे येथे बैठकीचे आयोजन केले होते.
नागोठणे : नागोठणे शहर व विभागांतील कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव, रिलायन्स कंपनीकडून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेला खेळखंडोबा, यामुळे परिसरांत रिलायन्स कंपनीविरुध्द स्थानिकांच्या मनात निर्माण होणारी खदखद, याचा आढावा घेण्यासंदर्भात रोहे तालुका प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन तसेच विभागांतील सरपंच व प्रतिनिधींची बैठक रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आयोजित केली होती. या बैठकीत खा. तटकरे यांनी अनेकांना धारेवर धरले.
रोहा तालुक्यात कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शनिवारी खा. तटकरे यांनी रोहे येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव ,नागोठणे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आदी उपस्थित होते
रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर त्राण पडत आहे. कोविड टेस्टसाठी शासकीय आरोग्य यंत्रणेकडूनच लेखी परवानगी घ्यावी लागत आहे, याकडे नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी या बैठकीत खा. तटकरे यांचे लक्ष वेधून घेताना पनवेल मेट्रोपॉलिस लॅबमध्ये खाजगी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर रुग्णाची कोविड टेस्ट करुन मिळावी अशी मागणी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तटकरे यांनी रायगडचे सिव्हिल सर्जन यांना
सूचना के ली.
दंडाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
तत्पूर्वी खासदार तटकरे यांनी रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना सरकारने तातडीने आर्थिक मदत केली आहे, परंतु बँकांच्या दुर्लक्षितपणामुळे नुकसानग्रस्तांच्या खात्यांत अद्यापही रक्कम जमा होत नसल्याने, संबंधित बँकांना तालुका दंडाधिकाऱ्यांनी पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.