पनवेल:लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीमध्ये विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठपुरावा करून नाव देण्याचा ठराव मंजूर करण्याचा आणि त्यांचे अभिनंदन करण्याचे ठरवण्यात आले आहे.
२४ जून रोजी दि. बा. पाटील यांची पुण्यतिथी विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवून साजरी करण्याचा ठराव ही या बैठकीत करण्यात आला. ही बैठक कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आगरी समाज हॉलमध्ये बुधवारी संपन्न झाली. लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृतीसमीतीच्या बैठकीमध्ये विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला मंजुरी लवकरात कशी मिळेल यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीसऱ्यांदा विजयाची हॅट्रीक केली आहे.
याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभीनंदन करून त्यांना नामकरणाचा ठराव लवकरात लवकर मंजुर करण्याची विनंती पत्राद्वारे करण्याचे ठरवण्यात आले. तसेच नव्या मंत्री मंडळामध्ये किंजरापू राममोहन नायडू हे नागरी विमान वाहतुक मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात भेट घेण्याचे ठरवण्यात आले.
दरम्यान नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदी मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. त्यांचे संसदीय कामकाज आटपून ते पुण्यात आल्यावर त्यांची नामकरणाचा विषय सर्वप्रथम संसदेत मांडणारे तत्कालीन खासदार कपिल पाटील आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्यांना नामकरणाविषयी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला. आगरी समाजाचे संजय दिना पाटील आणि सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे दोन प्रतिनीधी संसदेत खासदार म्हणून गेले आहेत. त्यांचा अभिनंदनाचाही ठराव याबैठकी करण्यात आला.