अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघात यंदाही नाम साधर्म्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सोमवारी १५ एप्रिल रोजी अनंत पदमा गीते आणि अनंत बाळोजी गीते या अपक्ष उमेदवारांच्या सूचक प्रतिनिधी यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाप्रमाणेच नाव असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे दरवेळी निवडणुकीत नाम साधर्म्य परंपरा यंदाही कायम राखण्यात आलेली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १२ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. मात्र १६ जणांनी २४ नामनिर्देशन पत्र नेले होते. सोमवारी १५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांनी सुरुवात केली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात सोमवारी अनंत पदमा गीते आणि अनंत बाळोजी गीते या दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सूचक यांच्यातर्फे दाखल केले आहेत. अनंत गीते हे इंडिया आघाडीचे प्रमुख उमेदवार आहेत. मात्र त्याच्या नावाचे साधर्म्य असलेले उमेदवार यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने यंदाही नाम साधर्म्य परंपरा कायम राहील असे वाटत आहे. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.