विमानतळाच्या नामकरणासाठी डिसेंबर २४ पर्यंत वाट पाहावी - रामशेठ ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 04:43 PM2024-01-13T16:43:39+5:302024-01-13T16:43:58+5:30
या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मधूकर ठाकूर
उरण : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी डिसेंबर २०२४ पर्यंत वाट पाहाण्याचे आवाहन करतानाच १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक शेतकरी लढ्यातील आंदोलनात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने चणे फुटाणे, लाह्या खाऊन सहभागी झाले होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना ही माहिती करून दिली.
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दिबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकनेते दि. बा.पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोप शनिवारी (१३) जासई येथील मंगल कार्यालय सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकल्पग्रस्ता़च्या न्याय्य हक्कांसाठी दिबांनी केलेला त्याग, तरुण पिढीला दिबांच्या कामांची माहिती करून देण्याचे अवघड कामही आता सर्वांना करावे लागणार आहे.शिवडी-न्हावा सेतू बाधीत पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोपही करण्यात आला.स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळविणाऱ्या यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करताना
रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कारही रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कामगार नेते भुषण पाटील यांनीही दिबांच्या आठवणींना उजाळा देताना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी प्रास्ताविकेतुन नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांनी दिबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या विविध कामे आणि संघर्षांची माहिती उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,अतुल पाटील,कामगार नेते महेंद्र घरत, भुषण पाटील,सुरेश पाटील,जासई सरपंच संतोष पाटील, उपसरपंच माई पाटील,नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत,अन्य पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.