नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला आॅपरेशनल थांबा, कर्जतकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:43 AM2018-01-23T02:43:30+5:302018-01-23T02:43:43+5:30

हुजूर साहिब नांदेड - पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला थांबा नसल्याने कर्जतकर प्रवाशांची मोठी अडचण होत असे. काही कारणाने ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकावर थांबली किंवा तिचा वेग कमी झाला तरी कर्जतला उतरणारे प्रवासी उतरत असत.

 Nanded-Panvel Express to be operated on Karjat, Amravati, Karjatkar | नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला आॅपरेशनल थांबा, कर्जतकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला आॅपरेशनल थांबा, कर्जतकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

googlenewsNext

कर्जत : हुजूर साहिब नांदेड - पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला थांबा नसल्याने कर्जतकर प्रवाशांची मोठी अडचण होत असे. काही कारणाने ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकावर थांबली किंवा तिचा वेग कमी झाला तरी कर्जतला उतरणारे प्रवासी उतरत असत. मात्र याप्रकाराने काही प्रवासी धडपडून पडत असत. कर्जतला थांबा मिळावा यासाठी अनेक संघटना, लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि सध्या तरी या गाडीला सहा महिन्यांसाठी कर्जत रेल्वे स्थानकावर आॅपरेशनल थांबा मिळाला आहे. यानिमित्ताने कर्जतकरांनी या गाडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
ही गाडी कर्जतला थांबावी म्हणून कर्जत रेल्वे प्रवासी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबरोबरच खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश लाड आणि काही अभ्यासू कर्जतकर प्रयत्नशील होते. अनेकदा अर्ज विनंत्या केल्या होत्या. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटले त्यावेळी पंकज ओसवाल यांनी जितेंद्र पाटील यांच्या समवेत कर्जत - पनवेल मार्गावर जाणाºया प्रत्येक गाडीला कर्जतमध्ये थांबा मिळालाच पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केली होती. तसेच पाटील व ओसवाल यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सीपीटीएम (चीफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजर) धनंजय नाईक यांची त्यांच्या दालनात जाऊन नांदेड-पनवेल या गाडीला कर्जत येथे थांबा देण्याची विनंतीही केली होती व निवेदन सादर केले होते. त्यावेळी त्यांनी थांब्याबद्दल सकारात्मकता दाखविली होती. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनीही यासाठी निवेदने देऊन रेल्वेच्या अधिकाºयांची भेट घेऊन या गाडीला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन या गाडीला सध्या सहा महिन्यांसाठी आॅपरेशनल थांबा मिळाला. मात्र या गाडीचे कर्जतपर्यंतचे किंवा कर्जतपासूनचे तिकीट वा आरक्षण मिळणार नाही असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले असून रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीसाठी हा खास करून थांबा असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सोमवारी कर्जत थांब्याच्या पहिल्याच दिवशी ही गाडी सुमारे एक तास उशिरा आली. गाडी येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि मनसेबाबतच्या विजयी घोषणांनी स्थानक दणाणून सोडले. गाडीचे चालक व्ही. प्रकाश व सहचालक अशोक कुमार यांचा कर्जतकरांकडून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष केतन शहा, कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, पंकज ओसवाल, नितीन परमार, योगेश पोथरकर, अशोक गायकवाड, विनोद पांडे, माजी अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, प्रभाकर करंजकर, सुनील गोगटे, कल्पना दास्ताने, स्नेहा पिंगळे आदी उपस्थित होते.
हे कुणा एकाचे श्रेय नसून सर्व कर्जतकरांच्या प्रयत्नाचे फळ असल्याचे सांगून अधिकृत थांब्यासाठी प्रयत्न केले जातील, असे केतन शहा यांनी स्पष्ट केले. जितेंद्र पाटील यांनी थांब्याविषयीची माहिती दिली. माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर यांनी आभार प्रदर्शन केले.एसआरपीचे विश्वनाथ सिंह, सी. पी. सिंह, जयसिंह व कर्मचारी यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड-पनवेलला कर्जतचा हा थांबा अधिकृत नसून तो आॅपरेशनल आहे तो लवकरच अधिकृत होण्याकरिता तसेच हा थांबा सध्या सहा महिन्यांकरिताच असून हा थांबा कायमस्वरूपी होण्याकरिता सर्वांना बरोबर घेऊन आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. यासाठी ‘लोकमत’ने सुद्धा चांगले सहकार्य केले आहे, हे विसरता येणार नाही.
- पंकज ओसवाल,
रेल्वे प्रवासी संघटना

Web Title:  Nanded-Panvel Express to be operated on Karjat, Amravati, Karjatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.