लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शनिवारी अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डब्ल्यू. उगले यांनी गुन्ह्यातून दोषमुक्त केले. त्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची २३ ऑगस्ट, २०२१ रोजी दक्षिण रायगडमध्ये यात्रा सुरू झाली होती. या यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणे यांना संगमेश्वर येथून अटक करण्यात आली होती. महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. हा खटला अलिबाग येथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वर्ग झाला होता. १ डिसेंबर, २०२२ रोजी सुनावणीला राणे हे वकिलासह न्यायालयात हजर झाले होते.